#WednesdayMotivation : ...आणि तिच्या घरात तब्बल चार वर्षांनी उजेड पडला

वाकी (ता. बारामती) - विजेचा मीटर बसविण्याप्रसंगी (डावीकडून) दीक्षा खवळे, रेखा खवळे व वीज कर्मचारी.
वाकी (ता. बारामती) - विजेचा मीटर बसविण्याप्रसंगी (डावीकडून) दीक्षा खवळे, रेखा खवळे व वीज कर्मचारी.

सोमेश्‍वरनगर - वाकी (ता. बारामती) येथील दीक्षा मिठू खवळे या मुलीला विजेअभावी घराबाहेरील हायमास्टच्या उजेडात दहावीचा अभ्यास करावा लागत होता. परंतु, वीजकंपनीच्या अधिकाऱ्यांनी विजेची थकबाकी स्वतः भरली आणि तिच्या घरात तब्बल चार वर्षांनी उजेड पडला. तिच्या जीर्ण घरासाठीही मदतीचा ओघही सुरू झाला आहे.

रेखा खवळे ही परित्यक्ता महिला स्वतःच्या मालकीच्या निवाऱ्याअभावी मुलगी दीक्षासह वाकी गावात आई पार्वती भिसे यांच्या अत्यंत जीर्ण घरात राहात आहेत. वयोवृद्ध आईसह मनोरुग्ण भावाचाही त्या मोलमजुरी करून सांभाळ करत आहेत. मुलगी दीक्षा न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती या विद्यालयात चिकाटीने दहावीत गेली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे फौजदार शरद वेताळ यांनी तिला पुस्तके, गणवेश व अन्य साहित्य घेऊन दिले आहे. 

मात्र, खवळे यांच्या घराचा वीजजोड थकबाकी साडेअकरा हजारांवर गेल्याने चार वर्षांपूर्वी तोडला होता. त्यात आता दहावीची परीक्षा जवळ आल्याने दीक्षा रात्रीच्या वेळी घराबाहेरील हायमास्टखाली बसून किंवा येरझाऱ्या घालून अभ्यास करत होती. याबाबतची माहिती समाजमाध्यमातून पसरली. त्यामुळे वीजकंपनीच्या सोमेश्वर उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच पुढाकार घेत तिची सर्व थकबाकी भरली. तिच्या घरी नवा मीटरही जोडून दिला. 

याबाबत वीज कंपनीचे उपविभागीय अधिकारी सचिन म्हेत्रे म्हणाले, ‘‘पूर्ण थकबाकी ऑनलाइन भरल्याशिवाय नवीन जोड देणे शक्‍य नव्हते. आमच्या उपविभागातील सगळ्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन थकबाकी भरून त्वरित नवीन जोड दिला.’’

लोकांच्या मदतीमुळे घरात उजेड पडला. आता पोरगी कितीही वेळ अभ्यास करू शकते. आता रेशनकार्ड वेगळे करून घ्यायचे आहे.
 - रेखा खवळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com