मृत्यूला कवटाळत दीप्तीने दिले एकाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

नागपूर - उपराजधानीत नातेवाइकाच्या लग्नाच्या आनंद सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी दिल्लीतून त्या आल्या होत्या. नाव दीप्ती अजय ग्रोवर. लग्नसोहळ्यात आनंदाचे क्षण अनुभवत असतानाच दीप्ती यांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मृत्यू अटळ असल्याचे कुटुंबीयांना कळून चुकले. दुःख बाजूला सारून दीप्ती यांचे यकृत दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. मृत्यूला कवटाळत दीप्तीने मृत्युशय्येवरील रुग्णाला नवजीवन दिले. 

दिल्लीत सीए म्हणून काम करणारे अजय ग्रोवर यांच्या पत्नी दीप्ती (वय ४८) त्यांना पेंटिंगचा छंद होता. त्यांचे वडील सैन्यात कर्नलपदी होते. वडिलांचे कुटुंब नागपुरात असल्याने त्यांची ये-जा होती. नातेवाइकाच्या लग्न समारंभासाठी दीप्ती दोन फेब्रुवारीला नागपुरात आल्या. परंतु, अचानक उलट्या सुरू झाल्या. भोवळ येत असल्याने त्यांना तातडीने कोराडी मार्गावरील एलेक्‍सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनसह विविध तपासणीत त्यांना ब्रेन हॅम्रेज झाल्याचे निदान झाले. मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. दोन दिवसांनी झालेल्या विविध तपासण्यांमध्ये मेंदू मृत झाल्याचे निदान झाले. रुग्णालयातील डॉक्‍टरांसह विभागीय प्रत्यारोपण समितीकडून महिलेच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. तातडीने एलेक्‍सिस रुग्णालयातील यकृताच्या प्रतीक्षायादीतील महिलेच्या गुणसूत्राशी साम्य असलेल्या रुग्णाला सूचना दिली.

उशिरापर्यंत चालले प्रत्यारोपण 
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चाललेली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एलेक्‍सिस रुग्णालयातील डॉ. अजिताभ श्रीवास्तव, डॉ. प्रकाश जैन, डॉ. आशीष सिंघल, डॉ. अमित गुल्हाने, डॉ. पीयूष श्रीवास्तवा, डॉ. दिलीप वासनिक, डॉ. शीतल आव्हाड, डॉ. श्रीकांत कोटे, डॉ. वीरेंद्र  भेलेकर, डॉ. राकेश भैसारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांना एलेक्‍सिसच्या अवयवदान समन्वयक  डॉ. मृणाल खोडे आणि डॉ. प्रीती जैन यांचे सहकार्य लाभले. विभागीय प्रत्यारोपण समितीच्या डॉ. विभावरी दाणी, डॉ. रवी वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्या वीणा वाठोरे यांनीही मदत केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipti Grovar Death Liver Transplant Surgery Life Saving Motivation