esakal | निराधार, कष्टकऱ्यांसाठी 'आई'चा आधार, भुकेल्यांसाठी भरविला जातोय मायेनं 'आहार'
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Pratishthan

निराधार, कष्टकऱ्यांसाठी 'आई'चा आधार, भुकेल्यांसाठी भरविला जातोय मायेनं 'आहार'

sakal_logo
By
विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : अमृतवाडीतील (ता. वाई) आई प्रतिष्ठानचे (Aai Pratishthan) शिलेदार आणि परिसरातील युवक एकत्र येऊन अन्नदात्याची भूमिका पार पाडत आहेत. पाचवड, भुईंज परिसरातील रुग्णालयातील रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना, त्याशिवाय इतर अनेकांना स्वच्छ, सकस, परिपूर्ण भोजन दररोज जागेवर पोच करतात, तेही निरपेक्ष भावनेने आणि स्वयंप्रेरणेने.. केवळ रुग्णालयातच नव्हे, तर महामार्गावरील ट्रकचालक, कष्टकरी, मजूर, निराधार, कातकरी वस्तीवरील लोक किंवा अगदी भिक्षेकरी असे कोणीही भुकेल्या जिवांना मोफत अन्नसेवेचा (Food Grains) यज्ञ या युवकांकडून चालवला जात आहे. (Distribution Of Food Grains To The Citizens Of Amrutwadi From Aai Pratishthan Satara News)

'आई फाउंडेशन'च्या या उपक्रमाद्वारे केवळ भुकेल्यांना अन्न दिले जात नाही, तर या महत्त्वाच्या कार्यापलीकडे जाऊन परिसरातील निराधार, वयोवृद्ध महिलांना जीवनावश्‍यक वस्तूंचे आणि औषधांचेही मोफत वितरण केले जाते. या उपक्रमातील दररोजच्या जेवणामध्ये चपाती, भाजी, भात, आमटी असतेच, शिवाय रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या मातांसाठी साजूक तूप घातलेला इंद्रायणी तांदळाचा गिजगा भात आणि वरण असे भोजन पोचवले जाते. भल्या पहाटे पाचवडमध्ये या कामाला ते सुरुवात करतात. स्वच्छता आणि आवश्‍यक त्या सर्व खबरदारी घेत जेवण बनवले जाते. या युवकांची तळमळ पाहून आचारी मामांही कामाचा मेहनताना घेत नाहीत. जेवण तयार झाल्यानंतर त्याचे पॅकिंग करून जिथून-जिथून मागणी तिथे-तिथे पोच करायला गाडी रवाना होते. या सर्व कामात त्यांना जे अनुभव येतायत, ते त्यांच बळ वाढवणारेच आहेत. ते आर्थिक मदत ते स्वीकारतच नाहीत... त्यामुळे मग कोणी साहित्य रूपाने मदत करतो.

हेही वाचा: तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना! वर्येत मित्राच्या स्मृतीसाठी साकारलं 'मैत्रीचं झाड'

"आम्ही हे केलं' आणि "आम्ही ते करतोय', हे सांगण्याचा सोसही नाही. अशाच भावनेने काम करणारा भुईंजच्या घुमूट आळीतील एक युवक असो, अथवा उच्च कंपन्यांतील उच्च पदाधिकारी असो की आई फाउंडेशनचे हे सारे मित्र असोत. यातील कोणालाही ना कोणती निवडणूक लढवायचीय, ना कोणती पदं मिळवायचीत, तरीही स्वतःतील संवेदनशील वृत्तीने स्वतःला गाडून घेऊन ते राबतायत. अगदी आनेवाडी टोलनाक्‍यापासून वेळ्यापर्यंत भुकेल्यांना अन्न पोचवण्यासाठी धावतायत. स्वतःची पावलंही उमटू न देता मदतीची एकसे बढकर एक भव्य शिल्प साकारत पुढे चाललेल्या या आई प्रतिष्ठानच्या शिलेदारांचे परिसरात कौतुक होत आहे.

Distribution Of Food Grains To The Citizens Of Amrutwadi From Aai Pratishthan Satara News

loading image
go to top