डॉक्‍टरांनी स्वीकारले मुलींचे पालकत्व

सुनील शेडगे
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

नागठाणे - स्वतः दुर्गम भागात वाढलेल्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकून डॉक्‍टर बनलेल्या विजय झोरे यांनी डोंगरउंचावरच्या वाडीतील दोन मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. या दोन मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी दरमहा शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

नागठाणे - स्वतः दुर्गम भागात वाढलेल्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकून डॉक्‍टर बनलेल्या विजय झोरे यांनी डोंगरउंचावरच्या वाडीतील दोन मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. या दोन मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी दरमहा शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

डॉ. झोरे हे मांडवे (ता. सातारा) गावालगत असलेल्या डोंगरउंचावरच्या गवळणवाडीचे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची. प्रतिकूलतेवर मात करत ते शिकले. शिकण्यासाठी मोठी पायपीट केली. त्यातून ते डॉक्‍टर बनले. सध्या कोरेगाव येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. आता संपन्नता पदरी येऊनही त्यांची गावाशी असलेली नाळ तितकीच घट्ट आहे. गावातील शाळेशी संपर्कही कायम आहे. अधूनमधून ते शाळेला भेट देतात. विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. यातून त्यांना स्मिता माने, आश्विनी शिंदे या मुलींची माहिती मिळाली. दोघीही कुशाग्र बुद्धीच्या. मात्र, शिक्षणाच्या आड परिस्थितीची अडचण. हे पाहून डॉक्‍टरांनी या दोघींचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. टोळेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. कार्यक्रमात मुलींना रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी नीलम झोरे, सागर मोरे, सिद्धार्थ करपे, भैरवगडचे सरपंच रामचंद्र साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा छाया माने, निवास साळुंखे, मुख्याध्यापक दादासाहेब पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. युवराज कणसे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र गुरव यांनी आभार मानले. दादासाहेब सोनावले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. झोरे यांच्या या दातृत्वाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

...अशीही बांधिलकी
डॉ. झोरे दरवर्षी गावात, शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. ग्रामस्थांना तसेच विद्यार्थ्यांवर विनामोबदला उपचार करतात.
टोळेवाडी (भैरवगड) येथील प्राथमिक शाळेस त्यांनी नुकताच एलसीडी प्रोजेक्‍टर संचही भेट दिला आहे. विविध शैक्षणिक साहित्याची भेटही त्यांनी यावेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Girl Student Guardian Motivation