डॉ. दाणी कुपोषितांच्या वैद्यकीय माता

भाग्यश्री राऊत
रविवार, 1 जुलै 2018

मेळघाटमधील बालमृत्यू ६० तर कुपोषण ७७ टक्‍क्‍यांनी घटले 
नागपूर - नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी यांनी मेळघाटमधील कुपोषित आदिवासी बालकांचे वैद्यकीय मातृत्त्व स्वीकारून पाच वर्षांत बालमृत्यू ६० टक्‍क्‍यांनी तर तीन महिन्यांत ७७ टक्‍क्‍यांने कुपोषण बरे केले.

मेळघाटमधील बालमृत्यू ६० तर कुपोषण ७७ टक्‍क्‍यांनी घटले 
नागपूर - नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी यांनी मेळघाटमधील कुपोषित आदिवासी बालकांचे वैद्यकीय मातृत्त्व स्वीकारून पाच वर्षांत बालमृत्यू ६० टक्‍क्‍यांनी तर तीन महिन्यांत ७७ टक्‍क्‍यांने कुपोषण बरे केले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. विभावरी दाणी यांना समाजसेवेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांच्या सासू प्रमिला दाणी या समाजसेविका होत्या. अठ्ठावीस वर्षाच्या वैद्यकीय कारकिर्दीमध्ये ग्रामीण भागातील गरीब लोकांची परिस्थिती व त्यांचे दुःख खूप जवळून बघितले. यामुळे २००८ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर मागास भागात सेवा द्यायचे ठरवले. याकरिता मेळघाटमधील अतिशय दुर्गम भागाची निवड केली. येथील डॉ. आशीष सातव यांच्या ‘महान’ संस्थेसोबत त्यांनी त्या भागाचा अभ्यास केला. जगातील सर्वात जास्त बालमृत्यूदर व कुपोषण असलेल्या आफ्रिकेच्या दुप्पट बालमृत्यूदर व कुपोषण मेळघाटमध्ये होते. त्यांनी शंभर गावात संशोधन करून बालमृत्यूची कारणे शोधून काढली. 

काही प्रसूती झोपडीत तर काही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी होत होत्या. त्यामुळे जन्मापासूनच बाळाला वैद्यकीय उपचार मिळत नव्हते. त्यातही आदिवासी लोकांची त्यांच्या चाकोरीतून बाहेर पडण्याची मानसिकता नव्हती. तरीही डॉ. दाणी यांनी हार न मानता पर्याय शोधून काढला. आहे त्याच परिस्थितीतून बालमृत्यूदर व कुपोषण कमी करायचे ठरविले. अधिकाअधिक प्रसूती दाईच्या हातांनी व्हायच्या. त्यामुळे त्यांनी दाईलाच प्रशिक्षित केले. याप्रमाणे प्रत्येक गावात एक प्रशिक्षित दाईची नेमणूक केली. पाच वर्षांनंतर बालमृत्यूदर ६० टक्‍क्‍याने कमी झाला. 
तसेच निरनिराळ्या प्रकारचे पोषणयुक्त आहार तयार करून सतत ३ महिने त्या कुपोषित बालकांना दिले. फक्त ३ महिन्यांत ७७ टक्के कुपोषण कमी करण्यात त्यांना यश मिळाले.  

तांत्रिक-मांत्रिकांना प्रशिक्षण 
मेळघाट अतिशय मागासलेला भाग असल्याने आदिवासी लोकांचा अधिक विश्‍वास तांत्रिक मांत्रिकांवर होता. यामुळे सर्व तांत्रिक मांत्रिकांना विश्‍वासात घेऊन त्यांना वैद्यकीय प्रशिक्षण दिले. डॉक्‍टरांकडे साशंक नजरेने बघणाऱ्या आदिवासींना या प्रशिक्षित मांत्रिकांकडून उपचार दिले. 

बिल गेट्‌स फाउंडेशनचे सहकार्य 
बालमृत्यूदराचा व कुपोषणाचा अहवाल शासनाला दाखविला. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने संपूर्ण मेळघाटमधील बालमृत्यूदर व कुपोषण कमी करण्याचे कार्य डॉ. विभावरी दाणी यांच्यावर सोपविले. जानेवारीपासून त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये ‘बील गेट्‌स फाउंडेशनसारख्या’ अनेक विदेशी संस्था त्यांच्यासोबत कार्य करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors Special Day Dr. Vibhawari Dani Malnutrition Motivation