दुष्काळग्रस्तांच्या मुलांचा 'स्नेह'वनात सांभाळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

भोसरीतील संगणक अभियंता अशोक देशमाने यांनी नोकरी सोडून राबविला उपक्रम
पिंपरी - दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सतरा मुलांचे पालन-पोषण भोसरीतील स्नेहवनात या संस्थेकडून केले जात आहे. यासाठी संगणक अभियंता अशोक देशमाने हे नोकरी सोडून हा उपक्रम राबवत आहेत.

भोसरीतील संगणक अभियंता अशोक देशमाने यांनी नोकरी सोडून राबविला उपक्रम
पिंपरी - दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सतरा मुलांचे पालन-पोषण भोसरीतील स्नेहवनात या संस्थेकडून केले जात आहे. यासाठी संगणक अभियंता अशोक देशमाने हे नोकरी सोडून हा उपक्रम राबवत आहेत.

कुटुंबातील विविध अडचणींसाठी शेतकरी कर्ज काढतात. मात्र, पीकच आले नाही. कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर असतो. कर्ज वसुलीसाठी बॅंकेकडूनही तगादा लावला जातो. यामुळे आलेल्या नैराश्‍यातून शेतकरी आत्महत्या करतात. काहींना कर्जबाजारीपणामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने शाळा सोडावी लागते. दुष्काळामुळे पीकच न आल्याने खायचे काय? असा प्रश्‍न काही कुटुंबासमोर असल्याने ते मुंबई किंवा पुणे अशा शहरात स्थलांतर करतात. त्यांच्या मुलांचे शिक्षणही याच कारणामुळे सुटते. अशा मुलांसाठी भोसरीत देशमाने यांनी स्नेहवन ही संस्था सुरू केली आहे.

संगणक अभियंता असणारे देशामाने हे पाच वर्षांपूर्वी शहरात नोकरीसाठी आले. त्यांना चाळीस हजार रुपये वेतन होते. तीन वर्षांपूर्वी ते दिवाळीसाठी गावाला गेले असता दुष्काळाची झळ कशी शेतकऱ्यांना बसत आहे, हे त्यांनी जवळून पाहिले. आपली प्रगती होईल. मात्र, ही प्रगती बघायला गावच शिल्लक राहील का? असा प्रश्‍न त्यांना पडला. आपल्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करायचे, असे त्यांनी निश्‍चित केले आणि त्यातूनच डिसेंबर 2015 मध्ये स्नेहवन संस्थेचा जन्म झाला.

स्नेहवनला जागेचा सर्वांत मोठा प्रश्‍न होता. यासाठी त्यांचे मित्र अनिल कोठे हे धावून आले. त्यांनी आपली एक एकर जागा कोणतेही भाडे न आकारता संस्थेसाठी दिली. त्यानंतर परभणी, जालना, बीड, हिंगोली, औरंगाबाद आणि वर्धा जिल्ह्यातील 17 मुलांना संगोपन व शिक्षणासाठी शहरात आणले. सुरवातीला काही दिवस देशमाने यांनी कंपनीत रात्रपाळी केली व दिवसा संस्थेसाठी काम केले. सुरवातीला अशोक यांच्या आई-वडिलांचा त्यास विरोध झाला. मात्र, नंतर त्यांनीही मुलाच्या या उपक्रमात सहभाग घेतला. मुलांचे शिक्षण संस्थेचे काम यासाठी देशमाने यांनी अखेर नोकरीचा राजीनामा दिला. आता त्यांची पत्नीही या कामात त्यांना मदत करीत आहे.

देशमाने यांच्या संस्थेची माहिती अमेरिकेत स्थायिक असलेल्या चेन्नईतील एका कुटुंबाच्या कानावर गेली. त्यांनी भोसरीत येऊन संस्थेचे काम पाहिले व त्यांना मदत म्हणून तीन संगणक व एक लॅपटॉप भेट म्हणून दिला.

मित्रांकडून होणारी मदत व देशमाने यांनी पाच वर्षे नोकरी करून साचविलेला पैसा यातून सध्या संस्थेचे काम सुरू आहे. आगामी वर्षात 40 मुलांना पालन-पोषण व शिक्षणाकरिता दत्तक घ्यायचे असून, त्यासाठी समाजानेही मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा अशोक देशमाने यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.

संस्थेचा पत्ता
स्नेहवन, हनुमान कॉलनी नं.2, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे
संकेतस्थळ - www.snehwan.in

Web Title: drought affected of childrens care snehwan