द्वारकाआजींकडून पूरग्रस्तांना मायेचा आधार...

सुनील शेडगे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

अडल्यानडल्या लोकांना, दीनदुबळ्यांना मदत करणे, हाच खरा पुण्याचा मार्ग आहे. हे ज्याला कळले, त्याचेच आयुष्य कडेला गेले.
- द्वारकाबाई देशमुख, शिवाजीनगर, ता. सातारा

नागठाणे - अखंड ऊर्जेचा स्त्रोत बनून गेलेल्या द्वारकाआजींनी कुटुंबासोबत पूरग्रस्त भागास भेट दिली. पूरग्रस्तांना मायेचा आधार देताना त्यांनी दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय केली. त्यापुढे जात शंभर महिलांना त्यांनी नव्या साड्यांची भेट दिली.

द्वारकाआजी म्हणजेच द्वारकाबाई यदू देशमुख. शेंद्रेलगत असणारे शिवाजीनगर (ता. सातारा) हे आजींचे गाव. वयाची ८० पार करूनही आजींचा उत्साह आजही कायम आहे. स्मरणशक्ती अगदी उत्तम आहे. ५० वर्षांपूर्वी स्वतः विहीर खोदून त्यांनी शून्यातून शेती उभी केली. कुटुंबाची प्रगती साधली आहे. त्यांच्या मुलांनी शिक्षण, उद्योग अन्‌ शेतीच्या क्षेत्रात लौकिक संपादन केला आहे. त्यांचे २५ जणांचे एकत्र कुटुंब आहे. ‘आदर्श माता’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. आजींच्या आयुष्याची ही यशोगाथा यापूर्वी ‘सकाळ’मध्येही प्रसिद्ध झाली होती. सध्या सुरू असलेली पूरग्रस्तांच्या जगण्याची परवड पाहून त्यांचे मन द्रवले. त्यांनी सदाशिव, तानाजी, शिवाजीराव, अधिकराव, मनोहर, आनंद या मुलांसह सुना, नातवंडांना सोबतीला घेतले. 

बी. वाय. घोरपडे, धर्मराज कदम, सुधाकर पवार, संजय भोसले, शंकर लाड, पांडुरंग राऊत, अंकुश काटे हे निकटवर्तीयही बरोबर होते. या सर्वांनी शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यस्थळ गाठले. तिथे पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे. येथील दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय आजींनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dwarakabai Deshmukh Help to Flood Affected Motivation