esakal | विद्यार्थी करताहेत रोजगारनिर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हेकरवाडी - तयार केलेल्या रोपांसोबत विद्यार्थी व प्रशिक्षक.

विद्यार्थी करताहेत रोजगारनिर्मिती

sakal_logo
By
ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी - विविध महाविद्यालयांतून विद्यार्थी पदवी घेतात. परंतु, त्यांना प्रायोगिक प्रशिक्षण देण्यात येत नाही. या पदव्यांचा त्यांना पुढे रोजगार व उद्योगधंदा निर्मितीसाठी काही उपयोग होत नाही, अशी ओरड नेहमीच होत असते. पण, आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी त्याला अपवाद ठरली आहेत. वनस्पतिशास्त्राच्या या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांतून गुलाब व तत्सम रोपे तयार केली असून, त्याला चांगली बाजारपेठही मिळविली आहे. 

गुलाब, अस्टर, गवती चहा, शेवंती व इतर विविध औषधी वनस्पती अशी अनेक रोप तयार करून ते त्याची सवलतीच्या दरात विक्री करत आहेत.

महाविद्यालयीन वेळेत तासिका व प्रात्यक्षिक झाल्यानंतर रोपे व कलमे तयार करणे, त्याची निगा राखणे, रोपे तयार झाली की बाजारात विक्रीसाठी नेणे ही सर्व कामे हे विद्यार्थी स्वतःच करतात. गेल्या तीन महिन्यांत या विद्यार्थ्यांनी तब्बल पाचशे गुलाब कलमांची विक्री केली आहे.

आम्ही दररोज थोडा वेळ कॉलेज सुटल्यानंतर या कामासाठी देतो ज्याला जसा वेळ असेल तसे आम्ही या रोपांची काळजी घेतो, असे प्राजक्ता पाखले या विद्यार्थिनीने सांगितले.

प्रायोगिक प्रशिक्षणाअंतर्गत विविध अभ्यासक्रम सुरू असतात. मात्र. आम्ही विद्यार्थ्यांना फक्त लेखी स्वरूपात माहिती न देता त्यांच्याकडून विविध प्रकारची प्रात्यक्षिके करून घेतो. रोपवाटिकेचे तंत्र शिकवून त्यांना भविष्यात उत्पन्नाचे साधन व रोजगाराची संधी कशी निर्माण करून देता येईल, यावर भर देतो.
- किशोर सस्ते, प्राध्यापक-प्रशिक्षक

loading image