दाणा खा, पाणी प्या अन्‌ भुर्रऽऽ उडून जा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

सोमाटणे - "या पाखरांनो! दाणा खा, पाणी प्या अन्‌ भुर्रऽऽ उडून जा...', अशी साद उर्से येथील शेतकरी रोहिदास धामणकर यांनी पक्ष्यांना घातली आहे. त्यांनी दीड एकर बाजरीचे पीक पक्ष्यांसाठी राखून ठेवले असून, पाण्याचीही सोय केली आहे. 

सोमाटणे - "या पाखरांनो! दाणा खा, पाणी प्या अन्‌ भुर्रऽऽ उडून जा...', अशी साद उर्से येथील शेतकरी रोहिदास धामणकर यांनी पक्ष्यांना घातली आहे. त्यांनी दीड एकर बाजरीचे पीक पक्ष्यांसाठी राखून ठेवले असून, पाण्याचीही सोय केली आहे. 

पूर्वी उर्से- बऊर रस्त्याच्या कडेने मोठे वृक्ष वाढलेले होते. परंतु पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी रस्त्याच्या कडेची लहान मोठी शेकडो झाडे तोडण्यात आली. या झाडांवर चिमण्यांचा चिवचिवाट असायचा. अन्य पक्ष्यांचेही वास्तव्य असायचे. त्यांची घरटी असायची. परंतु झाडे तोडल्याने पक्षीच दिसेनासे झाले. निवाऱ्यासह अन्न-पाण्यासाठी त्यांना इतरत्र भटकावे लागले. ही परिस्थिती पाहून चिमण्यांसह अन्य पक्ष्यांसाठी प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब व रोहिदास धामणकर यांनी पुढाकार घेतला. गेल्या महिन्यापासून त्यांनी पक्ष्यांना खाद्य देणे सुरू केले. आता त्यांनी आपल्या दीड एकर शेतात वाढलेले बाजरीचे पीक पक्ष्यांसाठी सोडून दिले आहे. त्यांच्या पाण्याची सोय केली आहे. बाजरीच्या ताटालाच प्लॅस्टिकचे छोटे ग्लास (कप) बांधले आहेत. त्यात दररोज पाणी टाकले जाते. तसेच शेताच्या बांधावरील मोठ्या झाडांवर पाण्याचे प्लॅस्टिकचे कॅन बांधले आहेत. त्यामुळे शेताच्या परिसरात पुन्हा चिवचिवाट सुरू झाला आहे. 

रोहिदास धामणकर म्हणाले, ""पवनमावळाच्या पूर्व भागात औद्योगीकरण वाढत चालल्याने व अन्न-पाण्याच्या शोधात पक्ष्यांचे स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे अनेक पक्षी दिसेनासे झाले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Rohidas Dhamankar