बापाच्या किडनी दानाची फौजदार होऊन उतराई

सुधाकर काशीद
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

कोल्हापूर - बाप पोलिस आणि मुलगाही पोलिस; पण पोलिस असलेल्या मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यामुळे बापाने मुलाला किडनी दिली. त्यामुळे मुलाची तब्येत व्यवस्थित झाली आणि बापाने दिलेल्या किडनीची उतराई त्या मुलाने पुढे फौजदार होऊन केली. आपला मुलगा फौजदार झाल्याची वार्ता काल त्या बापाच्या कानावर पडली आणि घळाघळा आनंदाश्रू म्हणजे काय असतात, याची अनुभूती त्या पोलिस कुटुंबाने घेतली.

कोल्हापूर - बाप पोलिस आणि मुलगाही पोलिस; पण पोलिस असलेल्या मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यामुळे बापाने मुलाला किडनी दिली. त्यामुळे मुलाची तब्येत व्यवस्थित झाली आणि बापाने दिलेल्या किडनीची उतराई त्या मुलाने पुढे फौजदार होऊन केली. आपला मुलगा फौजदार झाल्याची वार्ता काल त्या बापाच्या कानावर पडली आणि घळाघळा आनंदाश्रू म्हणजे काय असतात, याची अनुभूती त्या पोलिस कुटुंबाने घेतली.

दीपक ढंग व रामचंद्र ढंग या पोलिस बाप-लेकाच्या संघर्षमय आयुष्याची ही एक कथा आहे. रामचंद्र ढंग हे पोलिस हवालदार. त्यांचा मुलगा दीपक राज्य पातळीवरचा व्हॉलीबॉलपटू. तोही खेळातील प्रावीण्यावर पोलिसात भरती झाला; पण काही वर्षांनी त्याला किडनीचा विकार झाला व त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. दर तीन दिवसाला डायलेसिस सुरू झाले आणि डॉक्‍टरांनी दीपकला कोणीतरी किडनी दान केले तरच त्याला भवितव्य असल्याचे सांगितले.

आपल्या एकुलत्या एक मुलाची झालेली अवस्था पाहून रामचंद्र यांनी आपली किडनी द्यायचे ठरवले व बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होऊन त्यांची एक किडनी दीपकला बसविली. अर्थात योग्य उपचार झाल्याने दीपकची प्रकृती सुधारली. तो पुन्हा ड्यूटीवर हजर झाला. पुन्हा सायकलिंग, पोहणे, पदभ्रमंती याबरोबरच बास्केटबॉलचा सराव त्याने सुरू केला; पण एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने खातेअंतर्गत फौजदार परीक्षेचा सराव सुरू केला आणि काल त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

दीपक त्या परीक्षेत पास झाला. आपला मुलगा फौजदार झाला या आनंदाच्या वार्तेने रामचंद्र ढंग हा पोलिसबाप गलबलून गेला. किडनीच्या गंभीर विकारामुळे जो मुलगा हाताशी लागेल की, नाही अशी शंका असलेला आपला मुलगा बरा झाला, पुन्हा बास्केटबॉल खेळू लागला, एवढेच नव्हे, तर पुन्हा रात्र रात्रभर अभ्यास करून फौजदार झाला, हे पाहून आनंदाश्रूंनी त्यांचा गळा दाटून गेला. 

दीपक सध्या नागरी हक्क संरक्षण विभागात हवालदार आहे. करवीर पोलिस ठाणे व विशेष शाखेत त्याने काम केले आहे. आता तो फौजदार प्रशिक्षणासाठी नाशिकला रवाना होईल. 

बापाच्या ऋणातून कधी मुक्त व्हायचे नसते. त्या ऋणातच कायम राहायचे असते; पण आपली एक किडनी मला देऊन माझ्या वडिलांनी मला नवे जीवन दिले. त्यांना काय भेट द्यायची हा विचार माझ्या मनात आला आणि फौजदार होऊन त्याची उतराई करण्याचा मी प्रयत्न केला. माझी पत्नी दीपाली हिने माझ्या आजारपणाच्या काळात जे धैर्य दाखवले तेही मला विसरता येणार नाही. 
- दीपक रामचंद्र ढंग,
फौजदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father donate Kidney special story