esakal | अभियंता तरुणीकडून गरजूंना स्वखर्चाने मोफत जेवण
sakal

बोलून बातमी शोधा

Akanksha Sadekar

अभियंता तरुणीकडून गरजूंना स्वखर्चाने मोफत जेवण

sakal_logo
By
आशिष तागडे

पुणे - एक नव्हे दोन नव्हे तर तिने गेल्या तीन आठवड्यात जेवणाचे तब्बल पाच हजार डबे मोफत पुरविले आहेत. अर्थात तिच्यासाठी हा आकड्यांचा खेळ नसून गरजूंपर्यंत योग्यवेळी सकस आहार पोचणे हा उद्देश आहे. या अवलिया तरुणीचे नाव आहे आकांक्षा सादेकर.

आकांक्षा मूळची पुण्याची असली तरी तिचे शिक्षण स्कॉटलंडमध्ये झाले. स्कॉटलंडमध्ये बावीस वर्षे वास्तव्य केल्यानंतर पेट्रोलियम इंजिनिअर असलेली आकांक्षा नुकतीच पुण्यात आली. या ठिकाणी फ्रंटवर्करमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस यांचे हेव्ही ड्युटीमुळे भोजनाचे हाल होत असल्याचे लक्षात आले. त्यातून तिने सकस आहार पुरविण्याचा निर्धार केला. सध्या दिवसाला ती हजार डबे पुरविते. आकांक्षा स्वतः स्कूटरवर डबे घेऊन प्रत्यक्ष पोच करते.

‘माझा भाऊ नुकताच डॉक्टर झाला आहे, त्याचे ड्यूटी अवर्स आणि खाण्यापिण्याचे हाल मी जवळून पाहिले, त्यावेळीच ठरविले यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे,’ आकांक्षाने या कार्यामागची प्रेरणा सांगितली. ती म्हणाली, ‘‘आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेसा आराम मिळत नाही, निदान त्यांना चांगल्या पद्धतीचे जेवण तरी मिळाले पाहिजे. यासाठी मी काही नावे निश्चित केली आणि ६ एप्रिलपासून प्रत्यक्ष डबे देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दहानंतर शंभर, पंधराशे अशी संख्या वाढत आता ती पाच हजारांवर गेली आहे. काल रात्री पाच हजारावा डबा दिला. यामध्ये प्रामुख्याने फ्रंटलाइनवर काम करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलिस, विद्यार्थी यांचा समावेश आहे. सकस अन्न पोटात गेल्यावर त्यांना कामासाठी आणखी हुरूप यावा म्हणून पूर्णपणे मोफत हा उपक्रम सुरू केला.’’

आकांक्षा पूर्णपणे मोफत डबा देते. परंतु तिने डबे देणाऱ्या काही महिलांचा एक ग्रुप तयार केला आहे. ज्यांना पैसे देऊन डबा घेणे शक्य आहे, त्यांना या महिलांशी जोडून दिले आहे. त्यातून संबंधित महिलांना अर्थार्जन होत आहे.

हेही वाचा: देहविक्री करणाऱ्या महिलांना पुणे जिल्हा प्रशासनाकडून 8 कोटींचे अर्थसहाय्य

उपक्रमाबाबत

 • कोणाकडेही आर्थिक मदत मागितली नाही

 • स्वयंपाक करायला दोघा-तिघांना मदतीला घेतले

 • नागरिकांना माहिती मिळताच त्यावर काही जण डब्यासाठी स्वतःहून नोंद करायला लागले

 • काही जणांनी त्यावर मदतीसाठीही हात पुढे केला

 • गेल्या काही दिवसांत सुमारे साडेतीनशे किलो तांदूळ जमा

 • बुधवार आणि शुक्रवार पेठेत डबे देण्यासाठी जावे लागले

 • बुधवार पेठेतील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना डबे पुरविण्यास सुरुवात

असे चालते काम

 • बाणेरमध्ये किचनची निर्मिती

 • व्हॉट्सअॅपवर बुकिंग क्र. ९९६७८६९६१३

 • सकाळी नोंद झालेल्या डब्यांची पोच

 • दुपारी पुन्हा सायंकाळच्या डब्यांसाठी काम सुरू

 • सायंकाळी उशिरापर्यंत डबे पोचविण्याचे काम सुरू

loading image
go to top