कचऱ्यापासून इंधन, वीज आणि विटाही!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

सुक्‍या कचऱ्याच्या एकाच प्रकल्पातून जनरेटर आणि वाहनांच्या वापरासाठी इंधन, वीज, बांधकामासाठी वीटा तयार करण्यात महापालिकेच्या घोले रस्त्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात यश आले आहे. केरळ सरकारनेही त्याची दखल घेतली असून, त्रिसूरमध्ये या धर्तीवर प्रकल्प सुरू होत आहे.

पुणे - सुक्‍या कचऱ्याच्या एकाच प्रकल्पातून जनरेटर आणि वाहनांच्या वापरासाठी इंधन, वीज, बांधकामासाठी वीटा तयार करण्यात महापालिकेच्या घोले रस्त्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात यश आले आहे. केरळ सरकारनेही त्याची दखल घेतली असून, त्रिसूरमध्ये या धर्तीवर प्रकल्प सुरू होत आहे.

या पद्धतीचा शहरातील हा पहिलाच प्रकल्प आहे. सहा महिन्यांपूर्वी हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची दखल घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील ‘सायन्स ॲन्ड टेक्‍नॉलॉजी पार्क’चे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनीही केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सहा लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. या प्रकल्पात रोज ७०० किलो प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कचऱ्याचे विघटन होत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या फिल्टर पायरोलिसिस ऑईलचा वापर घरातील व उद्योगांच्या जनरेटरसाठी होऊ लागला आहे. डिझेलपेक्षा १५ रुपये लिटर कमी दरात ते मिळत आहे. त्यावर प्रक्रिया केलेल्या इंधनाचा औद्योगिक वापरासाठीही वापर होत आहे. या ऑईलचा वापर इथेनॉलच्या धर्तीवर डिझेलमध्ये करून त्याचा वापर शक्‍य आहे.  

गॅसिफिकेशनचे तंत्रज्ञान वापरून थर्माकोल, प्लॅस्टिक, पॅकिंगचे बॉक्‍स, सॅनिटरी पॅडस आदी सुक्‍या कचऱ्याचे विघटन या प्रकल्पातून होत आहे. हा प्रकल्प १२ तास कार्यान्वित राहण्यासाठी रोज १० युनिट वीज लागते तसेच महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून या प्रकल्पात रोज ७००-८०० किलो प्लॅस्टिक, थर्माकोलचे विघटन होत आहे. त्यांच्या राखेतून निर्माण होणाऱ्या विटांनाही बाजारपेठेत मागणी आहे. अवघ्या एक ते दीड हजार चौरस फूट जागेत हा प्रकल्प उभारणे शक्‍य आहे, अशी माहिती जी. डी. एन्व्हायर्मेंटलचे संचालक अजित गाडगीळ यांनी दिली.

प्लॅस्टिक, कचऱ्याचे विघटन करताना कोणतीही दुर्गंधी येत नाही. त्यामुळे लोकवस्तीतही प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो. महापौर मुक्ता टिळक, घनकचरा विभागाचे ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या प्रोत्साहनामुळे प्रकल्प यशस्वी झाला आहे. 
- अभिजित दातार, प्रकल्प संचालक 

एकाच प्रकल्पातून वीज, इंधन, वीटा आदी निर्माण होण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे महापालिकेचे धोरण आहे.
- ज्ञानेश्‍वर मोळक,  घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuels, electricity and bricks from the waste