गच्चीवरच्या बागेत ५० किलो हळदीचे उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

अशी जपली ओली हळद 
हळद काढून झाल्यानंतर त्यास सावलीत ठेवले जाते. सावलीत हळद वाळवल्यामुळे कंदापासून माती आपोआपच विलग होते. ती झटकून घेतली. कात्रीने कापून हळद कंद स्वच्छ केले. त्याचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले. १) मूळ व जाड आकाराचे मातृकंद व उपकंद पुढील वर्षासाठी बी म्हणून मातीच्या माठात राखेत जतन केले जातात. २) उपकंदाहून छोटे व आकाराने छोटे असलेले कंद हळदीचे लोणचे किंवा पावडर बनविण्यासाठी उपयोगात आणले जातात. ३) खराब झालेले कंद किंवा अगदी बाळहळद ही खत म्हणून किंवा झाडांना देण्यात येणाऱ्या पाण्यात त्याचा वापर केला जातो.

नाशिक - गच्चीवरची बाग विषयात काम करणारे संदीप चव्हाण यांनी किचन वेस्ट, पालापाचोळा वापरून भाजीपाला पिकवण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी नुकतेच ३० नर्सरी बॅग्ज वापरून ५० किलो हळदीचे उत्पादन घेतले. हे त्यांच्या उत्पादनाचे तिसरे वर्ष आहे.

जावयाची शेती क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन श्री. चव्हाण यांच्या सासूबाईंनी त्यांना लागवडीसाठी पावशेर ओल्या हळदीचे कंद भेट म्हणून दिले. पहिल्या वर्षी त्यांनी पाच किलो हळदीचे उत्पादन घेतले. उत्पादित झालेल्या हळदीचे लोणचे व काही घरात वापरण्यासाठी हळदपूड तयार केली. बाकीचे नवीन वर्षासाठी बी म्हणून राखेत ठेवले. दुसऱ्या वर्षी दोन किलो बीजाचे १५ किलो हळद उत्पादन केले. या वर्षी त्यांनी पाच किलो बी राखेत ठेवून त्याची जून २०१८ च्या मध्यावधीस लागवड केली. त्यातून आतापर्यंत ५० किलो हळद उत्पादन त्यांना मिळाले आहे. 

टेरेसमध्ये जागेची कमतरता असल्याने त्यांनी कुंडीऐवजी सोळा बाय सोळा इंच प्लॅस्टिकच्या नर्सरी बॅगेत प्रथम नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, वाळलेले किचन वेस्ट, सर्वांत वर दोन इंच लाल माती मिसळून आधीच्या वर्षाची माती वापरली. अर्थात, ही माती  खतासारखीच होती. अशा ३५ बॅग्जमध्ये चार-चार हळदीच्या मातृकंदाची लागवड केले. 

या वर्षी चांगल्या झालेल्या पावसाने कंद पोसले गेले. खत म्हणून गोमूत्र, पाणी, घरीच तयार केलेले देशी गायीचे शेणखत व माती टाकत राहिले. जीवामृत, आंबवलेले खरकटे पाण्याचाही उपयोग केला. जानेवारीपासून पिकाला पाणी देणे बंद केले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात माती बाजूला करून हळदीचे उत्पादन घेतले.

बाजारातील हळदीला पिवळा गडद रंग यावा म्हणून त्यास उकळवले जाते, पण हळद उकळवल्याने त्याचा अर्क निघून जातो. घरची हळद रंगाने पिवळीधमक नसली, तरी गुणाने व चवीने ती बाजारातल्या हळदीपेक्षा कितीतरी पटीने वरचढ आहे.
- संदीप चव्हाण, हळद उत्पादक, नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gallery Garden Turmeric Production Success Motivation