भोकरदनला सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव

भोकरदनला सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव

भोकरदन - शहरात यंदाचा गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श असा गणेशोत्सव ठरला आहे. यानिमित्त रक्‍तदान शिबिरे घेण्यात आली. शहर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वृक्षारोपणाचे उपक्रम झाले. गरजूंना मदत करण्यात आली. अगदी मनोरुग्ण तसेच भिक्षेकऱ्यांना दाढी-कटिंगसह स्नान घालून चकाचकही करण्यात आले. 

शहरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचे उपक्रम, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे अनेक उपक्रम घेण्यात आले. जनावरांसाठी पाण्याची टाकी ठिकठिकाणी ठेवण्यात आली. दरम्यान, शहरातील मानाचा गणपती असलेले नवतरुण गणेश मंडळ सोमवारी (ता.४) पेशवेनगरात निराधार, गरजूंना कपडे वाटप करणार आहे. 

१४३ बाटल्या रक्‍त संकलन
शहरातील विविध गणेश मंडळांनी यंदा रक्‍तदान शिबिरासाठी विशेष पुढाकार घेतला. यात १४८ बाटल्या रक्त संकलित केले आहे हे विशेष.

या शिबिरांमध्ये २४ महिलांनी रक्तदान केले, त्यातही ३ मुस्लिम समाजातील युवकांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा आदर्श ठेवला.

पेशवेनगरातील नवतरुण गणेश मंडळात १८ जणांनी रक्तदान केले. यात सर्वाधिक म्हणजे निम्म्या ९ महिला होत्या. म्हाडा रोडवरील समर्थ गणेश मंडळात ५४ जणांनी रक्तदान केले. यात ६ महिला तसेच ३ मुस्लिम समाजातील युवकांचाही सहभाग होता. रविवारी (ता.३) देशमुख गल्लीतील छत्रपती शिवाजी गणेश मंडळात ४१ जणांनी रक्तदान केले, यात ७ महिलांचा समावेश आहे. जैन समाजबांधवांनी रविवारी पर्युषण पर्व व गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर घेतले. यात ३५ जणांनी रक्तदान केले, यात २ महिला होत्या. आमदार संतोष दानवे यांनीदेखील भेटी देऊन मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे. शहरात विविध गणेश मंडळांनी नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कीर्तन स्पर्धाही घेतल्या. 

वृक्षारोपणाची मोहीम
शहरातील नवतरुण गणेश मंडळाने यंदा पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला. मंडळाच्या महिला सदस्यांनी आलापूर येथील रामेश्वर मंदिराच्या परिसरात रविवारी (ता.३) वृक्षारोपण केले. यापूर्वी छत्रपती शिवाजी गणेश मंडळ, श्री समर्थ गणेश मंडळानेही वृक्षारोपणाचे उपक्रम घेतले.

स्वच्छतेसाठीही पुढाकार
शहर स्वच्छतेचा नारा देत येथील बसस्थानक परिसर, शिवाजी चौक आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी गणेश मंडळ, श्री समर्थ गणेश मंडळानेही स्वच्छतेची मोहीम राबविली. या उपक्रमात नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी हेसुद्धा सहभागी झाले होते. 

पुजाऱ्यास उपचारासाठी मदत
शहरातील तुळजाभवानी नगरातील बाल गणेश मंडळाने यंदा कुठलेही कार्यक्रम न ठेवता वर्गणी व देणगीच्या रकमेतून तुळजाभवानी मंदिराच्या आजारी असलेल्या पुजाऱ्यास उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com