कराड इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांचे असेही गेट टुगेदर

कराड इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांचे असेही गेट टुगेदर

राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा निश्‍चय केला आणि जीवनाच्या उत्तरार्धात असलेल्या या टीमने अभयारण्यातील उगवाई मंदिर परिसर चकाचक केला. इतकेच नव्हे, तर तिथून निघताना उरलेलं आयुष्य उपक्रमासाठी काम करण्याची शपथ घेऊनच ते बाहेर पडले.

कराड इंजिनिअरिंग कॉलेजचे ते १९७६-७७ आणि ७८ सालचे हुशार विद्यार्थी. अभियांित्रकी डिग्री घेऊन जे बाहेर पडले, ते वेगवेगळी दिशा घेऊनच. कोण सरकारी अधिकारी झाले. कुणी स्वतःची बांधकाम व्यवसाय कंपनी निर्माण केली. कोण प्राध्यापक, तर कोण परदेशबाबू झाले, पण आपापल्यातील संवाद कमी होऊ दिला नाही. मिळेल तेव्हा बोलत, भेटत राहिले. 
आज हे सारेच मित्र निवृत्त होऊन आनंदी जीवन जगताहेत. प्रत्येक वर्षी किंवा शक्‍य तितक्‍या वेळा एकत्र येऊन, गप्पा, गाणी, जेवण, मौज करत. यावेळी त्यांनी वेगळेपण जपायचा निर्णय घेतला.

दोन वर्षापूर्वी सकाळने दाजीपूर अभयारण्य स्वच्छतेची घेतलेली मोहीम त्यांना आठवली आणि येथे येण्याचे नक्की केले. लगेचच त्यांनी  स्नेही नंदकिशोर सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधून निश्‍चित केले. ठिकाण ठरले उगवाई मंदिर. परवाच भर दुपारी या पंधरा जणांची टिम मंदिर परिसरात आली. त्यांनी स्वच्छतेला हात घातला. तीन तासांत २५ वर बॅगाभरून (टिक्की) प्लास्टिक आणि बाटल्यांचा निपटारा केला. ‘सकाळचे’ आभार मानले आणि आता यापुढे आयुष्य आहे, तोवर पर्यावरणपूरक उपक्रम करण्याची शपथ घेऊनच उठले. दुसऱ्या दिवशी या परिसरातील शाळांमध्ये जाऊन त्यांनी पर्यावरणविषयक निबंध व चित्रकला स्पर्धा घेतल्या. विजेत्यांना बक्षिसं दिली आणि परतले.

मोहिमेतील शिलेदार....
या उपक्रमात कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक येथून कॉलेजमित्र आले होते. सातारा तालुक्‍यातील तारळेचे विकास तारळेकर ७९ ला कॉलेजमधून बाहेर पडले ते देश सोडला. वीसएक वर्षे त्यांनी आफ्रिका व गल्फ येथे नोकरी केली. मोहन साखळकर नामांकित बिल्डर, प्रमोद पाटील फाय फौंडेशनचे सिईओ, मोहन पाटील प्राध्यापक, यांच्यासह बाळकृष्ण नाईक, प्रल्हाद घोरपडे, रवींद्र मोटे, रमेश अहिरराव, हरी पिसे, निळू कुलकर्णी, बाप्पा बोडके, पोपट शेकडे, रवींद्र सवाई, पांडुरंग शेवाळे, खेमचंद चंदवाणी, घनशाम पाठारे, प्रकाश नादगौडा, संजय इनामदार, अविनाश फडके यांनी सहभाग घेतला. त्यांना नंदकिशोर सूर्यवंशी व वनस्पतीतज्ज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांचे सहकार्य लाभले.

सगळे एकत्र यायचो, मौज करून जुन्या आठवणीत रमायचो; पण हा दिवस नव्या आनंदात जगलो. या वयातही नवं शिकलो. भरभरून निसर्ग पाहिला. यापुढे पर्यावरणपूरक ग्रुप करून काम करणार आहोत. राधानगरीचा निसर्ग आम्हाला भावला. यासाठी ‘सकाळ’कडून प्रेरणा मिळाली. 
- विकास तारळेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com