मुलीने गिरविला शहाणपणाचा कित्ता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

सावंतवाडी - काकांनी दागिन्यांसाठी देऊ केलेली रक्कम आपल्या शाळेला डिजिटल करण्यासाठी देण्याचे औदार्य तिसरीत शिकणाऱ्या गौरी बाळे या मुलीने दाखविले. आरोंदा कन्या शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने तिची ही मदत महत्त्वपूर्ण ठरली. यातून शाळेला ३० हजार रुपयांचा प्रोजेक्‍टर दिला आहे.

सावंतवाडी - काकांनी दागिन्यांसाठी देऊ केलेली रक्कम आपल्या शाळेला डिजिटल करण्यासाठी देण्याचे औदार्य तिसरीत शिकणाऱ्या गौरी बाळे या मुलीने दाखविले. आरोंदा कन्या शाळा डिजिटल करण्याच्या दृष्टीने तिची ही मदत महत्त्वपूर्ण ठरली. यातून शाळेला ३० हजार रुपयांचा प्रोजेक्‍टर दिला आहे.

तिसरीत शिकणाऱ्या गौरीने काका महादेव बाळे यांनी दिलेली रक्कम आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरोंदाला देऊन समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. आपली शाळा डिजिटल व्हावी, असे गौरीचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यास तिने आगळ्या पद्धतीने हातभार लावला आहे. तिचे काका महादेव बाळे याच शाळेत शिकले होते. आपल्या पुतणीला काही सोन्याची वस्तू द्यावी, या हेतूने बाळे यांनी गौरीच्या हाती स्वखुशीने ३० हजार रुपये दिले. मात्र, आपल्याला काही नको. आपण देत असलेले हे ३० हजार रुपये आपल्या शाळेला देऊ, असे तिने या वेळी काकांना सुचविले.

त्यामुळे आपल्या पुतणीने धरलेल्या आग्रहाखातर त्यांनी ३० हजार रुपयांची रक्कम कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल नाईक यांच्याकडे देण्याबद्दल चर्चा केली. केलेल्या चर्चेतून शाळेसाठी प्रोजेक्‍टर मिळाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना अभ्यासात होईल, असे सौ. नाईक यांनी या वेळी सांगितले. त्यानंतर त्या रुपयांतून शाळा डिजिटल करण्याच्या उद्देशाने एक प्रोजेक्‍टर भेट दिला. 

गौरीचे काका महादेव बाळे हे आरोंदा येथील बॅंक ऑफ इंडिया शाखेत शिपाई म्हणून कामाला आहेत. बाळे यांनी आपल्या पुतणीचा आग्रह व शाळा डिजिटल करण्यासाठी उचललेले पाऊल हे खरोखरच सामाजिक बांधीलकी जपणारे आहे. बाळे यांनी केलेल्या मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. प्रोजेक्‍टर शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांती बाळे, उपाध्यक्ष संतोष पेडणेकर, केंद्रप्रमुख व्ही. व्ही. चोडणकर, शिक्षणतज्ज्ञ मनोहर आरोंदेकर, गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई, सरपंच उमा बुडे, सहशिक्षिका माधवी वाके आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gauri bale amount donate to school