कलाशिक्षकाच्या हृदयदानाने ‘ती’ मृत्यूच्या दाढेतून बाहेर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

इच्छेनुसार अवयवदान
सोमवारी (ता. २१) मुंबईला, तर येत्या रविवारी (ता. २७) नाशिकला वाढदिवसाचा कार्यक्रम होणार होता. परंतु अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने घनघाव व संसारे कुटुंबीयांना मोठा धक्‍का बसला असल्याचे ॲड. मयूर संसारे यांनी सांगितले. आपल्या मृत्युपश्‍चात कुणाचे भले व्हावे, अशी अपेक्षा राजेश घनघाव यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे ॲड. संसारे यांनी सांगितले.

नाशिक - कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक ‘एक्‍झिट’ घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय, यकृत, हाडे, त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान मिळाल्याने ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली.                     

मूळचे नाशिकचे; परंतु मुंबई महापालिकेच्या शाळेत कलाशिक्षक असलेले राजेश अर्जुन घनघाव (वय ४२) यांना गेल्या शुक्रवारी मेंदुमृत घोषित करण्यात आले. आपल्या पाचवर्षीय चिमुकलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त असताना ते अचानक कोसळले. उपचारादरम्यान मेंदू मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेसह अन्य रुग्णांनाही पुनरुज्जीवन मिळाले. मृत्युपश्‍चात हृदय, यकृत, हाडे, त्वचा व डोळे दान करण्यात आले. त्यामुळे पाच जणांच्या आयुष्याची दोरी  बळकट झाली. 

सिडकोतील रहिवासी असलेले राजेश घनघाव बारा-तेरा वर्षांपासून मुंबईत कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. मुलीच्या पाचव्या वाढदिवसाच्या तयारीत ते व्यस्त होते. बिर्याणीची बुकिंग केल्यानंतर ते मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सिटी स्कॅन काढल्यानंतर मेंदूमधील वाहिनी तुटल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. १८) डॉक्‍टरांनी त्यांना मेंदुमृत घोषित केले. चिमुकलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त घनघाव कुटुंबीयांच्या आनंदावर क्षणात विरजण पडले. पत्नी दीपिका घनघाव आणि पाचवर्षीय मुलगी सांची तसेच समस्त घनघाव व संसारे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. रुग्णालयात स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी जिगिषा यादव यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करत अवयव दानाचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत कुटुंबीयांकडून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय, यकृत, त्वचा, डोळे, हाडे दान करण्यात आले. मुळच्या गुजरातच्या व मुलुंडच्या खासगी रुग्णालयात हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेवर हृदय प्रत्यारोपण करताना पुनरुज्जीवन घनघाव कुटुंबीयांच्या निर्णयामुळे मिळाले. हात दान करण्याचीही तयारी कुटुंबीयांनी दर्शविली होती. परंतु ‘झेडटीसीसी’मार्फत काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्याने ते होऊ शकले नाही. अनेक रुग्णांना नवीन जीवन देणाऱ्या राजेश घनघाव यांचा जलदान विधी शुक्रवारी (ता. २५) माउली लॉन्स येथे होणार आहे.

इच्छेनुसार अवयवदान
सोमवारी (ता. २१) मुंबईला, तर येत्या रविवारी (ता. २७) नाशिकला वाढदिवसाचा कार्यक्रम होणार होता. परंतु अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने घनघाव व संसारे कुटुंबीयांना मोठा धक्‍का बसला असल्याचे ॲड. मयूर संसारे यांनी सांगितले. आपल्या मृत्युपश्‍चात कुणाचे भले व्हावे, अशी अपेक्षा राजेश घनघाव यांनी बोलून दाखवली होती. त्यानुसार अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे ॲड. संसारे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghanaghav art teacher donate organ to give life to five people