esakal | वर्ध्यातील राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीमध्ये पटकाविले सुवर्णपदक
sakal

बोलून बातमी शोधा

वर्ध्यातील राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीमध्ये पटकाविले सुवर्णपदक

वर्ध्यातील राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीमध्ये पटकाविले सुवर्णपदक

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या ऊर्फ कल्याणने राज्य मैदानी स्पर्धेमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करताना अंगापूर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी त्याची जीपमधून भव्य मिरवणूक काढली. 

कामट्या (कल्याण) लक्ष्मण पवार हा फत्त्यापूरचा. पारधी समाजातील. आई- वडिलांची सततची भटकंती. तो जात्याच अत्यंत काटक, चपळ. पहिलीत असतानाच त्याच्यातील हे नैसर्गिक गुण त्याचे शिक्षक युवराज कणसे यांनी ओळखले. त्यांनी कामट्यावर लक्ष केंद्रित केले. त्याला आपल्यासोबत घरी आणले. श्री. कणसे यांच्या पत्नी संगीता याही प्राथमिक शिक्षिका. या कुटुंबाने कामट्याला आपल्याच घरातील घटक मानले. 

त्याची जिद्द अन्‌ प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे कामट्याची सहा वर्षांपूर्वी शासनाच्या क्रीडाप्रबोधिनी उपक्रमात निवड झाली. सध्या तो कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेतो. त्याच्या शिक्षण, खेळाच्या खर्चाचा भार शासनातर्फे उचलला जातो. कुस्तीत त्याने प्रावीण्य संपादन केले आहे. वर्धा येथे नुकत्याच आयोजित राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात त्याने सुवर्णपदक पटकाविले. त्याबद्दल फत्त्यापूर येथील ग्रामस्थांनी त्याचा व श्री. कणसे यांचा सत्कार आयोजिला. त्याच्यासह वैष्णवी कणसे, सिद्धी कणसे, वैभव शेडगे, आश्विन भुजबळ, स्वयंम कणसे, प्रतीक कणसे या यशस्वी खेळाडूंचीही जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी अंगापूर, फत्त्यापूर परिसरातील शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

...असे झाले नामकरण! 
प्रारंभीच्या काळात कामट्या या नावाला सारेच हसत. त्याचे कामट्याला वाईट वाटत असे. त्यावर मार्ग शोधताना तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मंगल सोनावले यांनी त्याचे कल्याण असे नामकरण केले. क्रीडाप्रबोधिनीत उज्ज्वल कामगिरी करून त्याने आपले नाव सार्थ केले. 

loading image