तुंग - चुकलेल्या आजीला युवकांनी मिरजेत लेकीकडे सोडले. त्यावेळी कुटुंबीयांसोबत आजी (मध्यभागी) व चार युवक.
तुंग - चुकलेल्या आजीला युवकांनी मिरजेत लेकीकडे सोडले. त्यावेळी कुटुंबीयांसोबत आजी (मध्यभागी) व चार युवक.

आजीची चुकलेली वाट अन्‌ माणुसकी!

तुंग - कामावरून घरी परतणाऱ्या अतुल पाटील (वसगडे, ता. पलूस) यांना आढळलेल्या आजीला मिरजेत नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचवून युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. शनिवार ३० जूनची ही घटना परिसरात चर्चेचा विषय झाली आहे. 

सांगली-पलूस मार्गावर मौजे डिग्रज फाट्याजवळ घरी निघालेल्या अतुल पाटील यांना ७५ वयाची आजी अंधारात चालत निघालेली दिसली. विचारपूस केली. पण आजीला काहीच सांगता आले नाही.

‘गावात चाललोय’ एवढंच ती म्हणाली. श्री. पाटील यांनी आजीला नांद्रेत सोडले. ते पुढे वसगडेला गेले. 

रात्री ९.३० वाजता अतुल व मित्र भरत पाटील तुंग (ता. मिरज) येथे मारुती दर्शनासाठी मोटारसायकलने निघाले. नांद्रे-मौजे डिग्रज रस्त्याकडेला परत तीच आजी त्यांना दिसली. चौकशी केली असता आजी थकलेली, अशक्त झालेली होती. नीट दिसतही नव्हते. नांद्रेत सोडल्याची आठवण सांगताच ती थांबली. ‘मला लेकीकडे सोडा’, अशी याचना करू लागली. 

पत्ता, नाव, गावच सांगता येत नव्हते. अखेर आशाताई किशन कांबळे (वय ७५, उदगाव, जि. कोल्हापूर) असे नाव तिने सांगितले. युवकांनी मित्र निखिल चौगुलेला  उदगावला खात्री केली. रात्रीचे १०.३० वाजले. चौगुलेने ‘आजी मिरजेत लेकीकडे राहते’ असे सांगितले. युवकांनी मिरजेतील संपर्क क्रमांक, पत्ता मिळवला. देवदर्शन रद्द करून त्यांनी अभिजित पाटील, वैभव पाटील यांना चारचाकी आणायला लावली. चार दिवसांपासून बेपत्ता आजी गाडीत बसायला तयार होईना. अखेर गाडीत बसायला तयार झाली आणि सुरू झाला चुकलेल्या आजीचा घराकडे परतीचा प्रवास. 

नांद्रेतून एक तासात चार युवक आजीसह मिरजेत ११.३० वाजता पोहोचले. तोपर्यंत घराच्या दारात २०/२५ माणसे जमली होती. आजी गाडीतून उतरल्या उतरल्या मायलेकी एकमेकांच्या गळ्यात पडल्या. अश्रूंचा बांध फुटला. आजी बेपत्ता आहे म्हणून पोलिसांत पण तक्रार दिली होती. पाहुणे ये- जा करीत होते. शहर  पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हकीकत समजताच युवकांना त्यांनी सलाम केला. वाट चुकलेल्या आजीला सुखरूप घरी पोहोचवणारे युवकच आजीची रक्‍ताची नव्हे तर जन्मांतरीची मुले ठरली.

अंतःकरणाची हाक
आजी घरी पोहोचताच सर्वांना समाधान वाटलं. आजी हसत हसत म्हणाली ‘ती चार पोरं कुठायत’. लेकीने चौघांकडे बोट करून दाखवलं. आजी म्हणाली, ‘बाळांनो थांबा. मी जेवण करून तुम्हाला वाढते.’ युवकांचेही मन भरून आले. देवदर्शनापेक्षा ही सेवा त्यांना महत्त्वाची वाटली. त्यांनी आजीचे दर्शन घेतले. जड अंतःकरणाने निरोप घेतला.

वाट चुकल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या वृद्ध आजीला रात्रीच घरापर्यंत पोहोचवणारे चार युवक देवदूतच आहेत. त्यांना सलाम.
- रवींद्र कांबळे, मिरज, आजीचा नातू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com