अर्ध्या एकरात तब्बल साडेसात टन काकडी! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नागपूर - केवळ अर्धा एकर शेतीत तब्बल साडेसात टन काकडी उत्पादन घेतले म्हटल्यावर यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. पण, हा यशस्वी प्रयोग कुही तालुक्‍यातील लांजा येथील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवित शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. 

नागपूर - केवळ अर्धा एकर शेतीत तब्बल साडेसात टन काकडी उत्पादन घेतले म्हटल्यावर यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. पण, हा यशस्वी प्रयोग कुही तालुक्‍यातील लांजा येथील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवित शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. 

रवींद्र कुंभारे असे अर्धा एकरात साडेसात टन काकडीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहे. मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी पूर्वीपासून शेतीशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. अलीकडे शेती तोट्याची झाली म्हणून बरेचजण ती सोडून दुसऱ्या व्यवसायाच्या शोधात भटकत आहे. मात्र, कुंभारे यांनी नोकरी सांभाळत असताना शेतीलादेखील तेवढेच महत्त्व दिले. कुही तालुक्‍यातील लांजा येथे त्यांची बारा एकर शेती आहे. 

सुरुवातीला सिंचनाची सोय नव्हती. त्यामुळे शेती करण्यास अडचण जात होती. यानंतर त्यांनी सिंचनासाठी बोअरवेल, शेततळे तयार केले. शेती चांगली विकसित केली. सुटीच्या दिवशी व जेव्हा त्यांना सवड मिळेल तो वेळ ते शेतीसाठी देतात. एकूण 12 एकर शेतीमध्ये काही एकरवर त्यांनी कापूस, गहू, सोयाबीन, तुरीची लागवड केली. काही जागेवर आंबा, चिकू, फणस भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यावर्षी प्रथमच अर्धा एकर जागेवर त्यांनी काकडीची लागवड केली. लागवडीपासून झाडांच्या वाढीपर्यंत त्यांनी काळजी घेतली. तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना अर्धा एकरमध्ये काकडीच्या लागवडीपासून तब्बल साडेसात टन काकडीचे उत्पादन झाले. काकडीच्या लागवडीसाठी त्यांना 75 हजार रुपयांचा खर्च आला. साडेसात क्विंटल काकडीच्या विक्रीतून त्यांना 1 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. काकडीचे पुन्हा एक दोन तोडे निघण्याची शक्‍यता आहे. यंदा तापमान अधिक असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. अन्यथा यात पुन्हा वाढ झाली असती. शेती तोट्याची नाही. योग्य नियोजन आणि त्यात नवीन प्रयोग केल्यास ती शेतकऱ्यांना समृद्ध करण्यास मदतच करीत असल्याचे कुंभारे सांगतात. 

फळ बागेतून चांगले उत्पन्न 
कुंभारे यांनी काही एकरवर आंबा, चिकूची लागवड केली आहे. यावर्षी आंब्याचे उत्पादन येण्यास सुरुवात झाली. दशहरी, लंगडा या प्रजातीच्या आंब्याच्या विक्रीतून त्यांना दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

नर्सरी तयार करणार 
शेततळ्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून, बोअरवेलची पाण्याची पातळी वाढली. पुरेसे पाणी असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना आंबा, चिकू, मिरची व भाजीपाला पिकांची दर्जेदार रोपे तयार उपलब्ध करून देण्यासाठी नर्सरी तयार करणार असल्याचे कुंभारे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half acre thirty cottage tonne cucumber