अंधाऱ्या जीवनात ‘त्याने’ शोधली प्रकाशवाट

मिलिंद देसाई
बुधवार, 17 एप्रिल 2019

बेळगाव - घरातील मुलाने शिकावे, खेळावे, बागडावे, मित्रांबरोबर मौजमजाही करावी, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, हसतखेळत शाळेत जात असतानाच शारीरिक अपंगत्व आल्याने शाळा सोडावी लागलेल्या एका जिद्दी विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. पीयूष आढाव असे विद्यार्थ्याचे नाव असून, बहि:स्थ विद्यार्थी म्हणून त्याने कला शाखेतून ६० टक्‍के गुण मिळविले.

बेळगाव - घरातील मुलाने शिकावे, खेळावे, बागडावे, मित्रांबरोबर मौजमजाही करावी, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, हसतखेळत शाळेत जात असतानाच शारीरिक अपंगत्व आल्याने शाळा सोडावी लागलेल्या एका जिद्दी विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. पीयूष आढाव असे विद्यार्थ्याचे नाव असून, बहि:स्थ विद्यार्थी म्हणून त्याने कला शाखेतून ६० टक्‍के गुण मिळविले. शारीरिक अपंगत्वावर मात करीत त्याचे हे यश प्रेरणादायी ठरले आहे.

पदवीपूर्व शिक्षण खात्याने काल  (ता. १५) बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी निकाल पाहून अनेकांवर अभिनंदनाचा वर्षावही झाला. मात्र, खरा आनंद पीयूषच्या आई-वडिलांसह त्याच्या कुटुबांला झाला आहे. सहा वर्षांपूर्वी फुटबॉल खेळताना पाठीत दुसऱ्या मुलाचं ढोपर लागण्याचं साधं निमित्त झालं अन्‌ अभ्यासात आणि खेळात रमणारा पीयूष कायमचा अंथरुणाला खिळला. त्यातच डॉक्‍टरांच्या चुकीच्या निदानामुळे त्याच्या कमरेखालचा भाग कायमचा निकामी झाला.

शारीरिक अपंगत्व आल्याने शाळेत न येण्याचे पीयूषला सांगण्यात आले. त्यानंतर पीयूषला शाळेत घेण्यासाठी त्याचे वडील प्रताप आढाव आणि त्यांच्या कुटुंबाने शिक्षण खाते आणि इतर ठिकाणी जाऊन अक्षरश: उंबरठे झिजविले. मात्र, दरवेळी पदरात निराशा यायची. तरीही खचून न जाता प्रताप आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न चालूच ठेवले. ही दुर्घटना घडली तेव्हा पीयूष आठवीला होता. पण, काहीच मदत मिळाली नसल्याने बहि:स्थ विद्यार्थी म्हणून त्याने परीक्षा दिल्या. त्यानंतर कॉलेजला कधीही न जाता स्वत:च अभ्यास करून पीयूष बारावी उत्तीर्ण झाला आहे. त्याने शहापुरातील चिंतामणराव पदवीपूर्व महाविद्यालयात परीक्षा दिली. त्यासाठी पालकांना पेपरच्यावेळी पीयूषला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी वाहनाची सोय करावी लागली.

वडिलांचे स्वप्न आणि माझे ध्येय गाठण्यासाठी मी घरीच अभ्यास केला. बारावी परीक्षेत समाधानकारक गुण मिळाले आहेत. आता पदवी मिळवायची असून, स्वत:च्या पायावर पुन्हा उभे राहायचे आहे.
- पीयूष आढाव

दैनिक सकाळमधील पियूष आढाव यांच्या संदर्भातील वृत्त वाचल्यानंतर मी आज त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली व त्याच्या उपचारासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांशी चर्चा करून त्याच्या उपचाराची जबाबदारी घेणार आहे.    

- माजी महापाैर विजय मोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicap Piyush Adhav success in PUC exam special story