esakal | अपंगत्वावर मात करीत उद्योगात उभारी
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka-Patil

अपंगत्वावर मात करीत उद्योगात उभारी

sakal_logo
By
चेतना चौधरी

धुळे - जन्मतःच एक हाताचे अपंगत्व. यानंतर पतीही दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने संसार ‘डोळस’पणे उभारण्याची खूणगाठ आधीच मनाशी बांधली. अपंगत्वाचा न्यूनगंड बाजूला सारत बचत गटातून कर्ज घेऊन उद्योग उभारणाऱ्या प्रियांका पाटील यांनी संसाराला हातभार लावत प्रकाशाचा नवा किरण शोधला. उच्चतम दर्जा आणि वेळेवर मालाच्या पुरवठ्याचे वैशिष्ट्य जोपासणाऱ्या प्रियांकाताईंचा उद्योग आता सरासरी तीन लाखांचे उत्पन्न वर्षाकाठी मिळवून देतो आहे.

पदवीपर्यंत शिक्षण घेऊन शिवण क्‍लास, पत्रावळी, द्रोण बनविणे यांसारख्या उद्योगातून स्वावलंबी होत सर्वसामान्य महिलांच्या स्पर्धेत उतरत आर्थिकदृष्ट्या विकसित होण्याचे स्वप्न त्या नेहमीच पाहतात. अहोरात्र परिश्रम घेऊन मिळणाऱ्या प्रत्येक अनुभवातून निर्माण केलेले मार्केटिंग कौशल्यही कौतुकास्पदच आहे. एकाच हाताने कौटुंबिक जबाबदारी सांभाळत स्वतः उत्पादन तयार करणे शिवाय दुकानदारांपर्यंत ते पोहोचविण्याचे काम ‘त्या’ सहज करतात. 

आर्थिक संकटातून शोधली संधी 
पती शालिकराव भिला पाटील एका खासगी शिक्षण संस्थेत विशेष शिक्षक म्हणून नोकरीस होते. मुलगा तीन वर्षांचा झाला तोपर्यंत सर्व काही सुरळीत असताना अचानक पतीचा पगार बंद झाला. मोठे आर्थिक संकट समोर उभे राहिले. बचत गटात आधीपासूनच सहभागी होत्या. शिवाय शिवणकामाची कलाही अवगत होती. गटाकडून सुरवातीला दहा हजारांचे कर्ज घेतले. अपंग हाताचा अडसर बाजूला सारून शक्‍य होईल तो उद्योग उभारायचा ठरवले आणि तेथूनच त्यांच्या प्रगतीला सुरवात झाली. 

मार्केटिंगमध्येही अग्रेसर 
पत्रावळी तयार करायचे मशिन घेतल्यानंतर दुसऱ्या गटाकडून कर्ज घेऊन कच्चा माल भरला. बाजारात विक्रेत्यांना देताना मालाला खूपच कमी किंमत मिळायची. अशा वेळी स्वतःच फिरत उत्पादित मालाचा दर्जा सांगितला. लग्नसराई, धार्मिक कार्यक्रमांतील ऑर्डरही कमिशन तत्त्वावर आधीच घेतल्या. तिसऱ्या टप्प्यात मिळालेल्या कर्जातून शिलाई मशिन खरेदी केले. आता लग्नसराई वगळता इतर वेळी शिलाईकाम चालते. वर्षभर हाताला काम मिळाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नही सहज सुटतो.

आर्थिक समृद्धीचे पाऊल 
महापालिकेचे बचत गट, जळगाव जनता बॅंक तसेच एचडीएफसी बॅंकेतील बचत गटांत गेल्या आठ वर्षांत कार्यरत असलेल्या प्रियांका ताईंनी विविध टप्प्यांत एक लाखापर्यंत कर्ज घेतले. त्या पैशातून स्वतःचा उद्योग उभारला. आता त्यांच्या गटाचे तीस ते चाळीस हजार रुपयांचे शेअर्स बॅंकेत आहेत. एकाच हाताने काम करीत उद्योगाचा वटवृक्ष उभारणाऱ्या प्रियांका पाटील आता शारीरिकदृष्ट्या सक्षम महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.

loading image