खाणाखुणांवर चालते कंगवा-कात्री

सुधाकर काशिद
मंगळवार, 28 मे 2019

'बोलणाऱ्यांची मातीही खपते; पण न बोलणाऱ्यांचे सोनेही खपत नाही,' अशी एक म्हण आहे; पण वृषभ व सौरभ या सख्ख्या भावांनी ही म्हण खोटी ठरवली आहे. हे दोघेही मूकबधिर आहेत. पण, केशकर्तनाचा व्यवसाय आणि तोही न बोलता यांनी करून दाखवला आहे. केवळ खाणाखुणांवर त्यांची कंगवा-कात्री चालते.

मूकबधिर केशकर्तनकार भावांच्या जिद्दीला गावकऱ्यांशीही साथ
कोल्हापूर - "बोलणाऱ्यांची मातीही खपते; पण न बोलणाऱ्यांचे सोनेही खपत नाही,' अशी एक म्हण आहे; पण वृषभ व सौरभ या सख्ख्या भावांनी ही म्हण खोटी ठरवली आहे. हे दोघेही मूकबधिर आहेत. पण, केशकर्तनाचा व्यवसाय आणि तोही न बोलता यांनी करून दाखवला आहे. केवळ खाणाखुणांवर त्यांची कंगवा-कात्री चालते.

सौरभ व वृषभ हे दोघे हातकणंगले तालुक्‍यातील हेरले गावचे. वडील चंद्रकांत साखर कारखान्यात नोकरीला. या दोन्ही दिव्यांग तरुण मुलांच्या भवितव्याची त्यांना चिंता लागलेली होती. ते जातीने नाभिक. त्यामुळे या दोघा मुलांनी आम्ही केस कापण्याचा पारंपरिक व्यवसाय करतो, असे वडिलांना खाणाखुणावरून सांगण्याचा प्रयत्न केला. वृषभ व सौरभ हे मूकबधिर असल्याने हा व्यवसाय कसे करू शकतील, ही शंका त्यांना होती. कोल्हापुरात सयाजी झुंजार यांच्या सयाजी ऍकॅडमीमध्ये या दोघांना केस कापण्याचे प्रशिक्षण देण्याची विनंती वडिलांनी केली.

झुंजार यांनीही ही काहीशी अवघड जबाबदारी स्वीकारली. झुंजार यांच्या बोलतानाच्या ओठाच्या हालचालीवरून जरूर ती माहिती या दोघांनी आत्मसात केली. हेरले येथे चारच दिवसांपूर्वी त्यांनी केशकर्तनालय सुरू केले.

या दुकानात ग्राहकांची गर्दी आहे. हेरल्यातील तरुणांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. आपण सांगणार एक, हे करणार दुसरेच आणि आपल्या केसांची स्टाईल बिघडणार, ही भीती तरुणांनी बाजूला ठेवली आहे. दुकानात येणारे ग्राहक केस कसे कापायचे, हे त्यांना खाणाखुणा करून सांगतात आणि त्या खाणाखुणा ध्यानात ठेवून हे दोघे व्यवस्थित केस कापतात. केस कापून झाले, की ग्राहक आणि हे बंधू एकमेकांकडून बघून फक्त हसतात. जणू "ओ के भावा' असे समाधानाचे भाव ते व्यक्त करतात.

दुकान काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. तरीही ग्राहकांची चांगली ये-जा आहे. वृषभ आणि सौरभ दोघेही खूश आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरची ही खुशी पाहून त्यांचे वडीलही आनंदी आहेत.

केशकर्तनालय म्हणजे गप्पाटप्पा मारत बसण्याचे ठिकाण ही ओळख या भावांनी पुसून टाकली आहे. न बोलताही सुख-समाधान कसे अनुभवता येते, याचेच हे उदाहरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicapped Vrushabh and Saurabh Barbar Business Success Motivation