मोफत शस्त्रक्रियेमुळे चिमुरड्याला जीवदान

राजकुमार थोरात
बुधवार, 16 जानेवारी 2019

वालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी त्यासाठी सहकार्य केले. 

वालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी त्यासाठी सहकार्य केले. 

इंदापूर शहरातील कांतेश व कविता कांबळे यांच्या चार वर्षांच्या लायप्पा या मुलाच्या हृदयाला जन्मापासून छिद्र होते. यामुळे त्याला चालतानाही दम लागत होता; तसेच तो धावू शकत नव्हता. चार वर्षांपर्यंत छिद्र न भरून आल्यास तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला होता. यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणारे कांतेश कांबळे ३ लाख रुपये जमा करण्यासाठी महिनाभरापासून इकडे-तिकडे फिरत होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी ते प्रवीण माने यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी गेले होते. माने यांनी संपूर्ण परिस्थिती जाणून घेऊन मोफत शस्त्रक्रिया करण्याची ग्वाही दिली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने तातडीने मुंबईमधील माहीम वेस्ट येथील रहेजा हॉस्पिटलमध्ये संपूर्ण शस्त्रक्रियाच मोफत करून दिली. लायाप्पावर १० जानेवारी रोजी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. यासाठी डॉ. पूर्वीक मेहता यांनी परिश्रम घेतले.

एक रुपयाही खर्च आला नाही...
लायप्पाचे वडील कांतेश कांबळे म्हणाले, ‘‘शेतमजुरी करून मी संसार चालवत आहे. शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये जमा करणे शक्‍य नव्हते. सभापती प्रवीण माने यांनी केलेल्या मदतीमुळे एक रुपया ही खर्च न करता शस्त्रक्रिया झाली. मुलाची तब्येतही चांगली आहे. तो आत्ता धावू शकणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने वर्षभरामध्ये १३ गरजू बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात आली असून यापुढे ही असेच काम सुरू ठेवणार आहे.
- प्रवीण माने, सभापती, बांधकाम व आरोग्य समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heart Surgery Layappa kamble Lifesaving Initiative Motivation