उच्चशिक्षितांकडून अनाथांसाठी ‘हेल्पिंग हॅंड’

सुधीर साबळे
सोमवार, 7 जानेवारी 2019

पिंपरी - अनाथ विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना समाजात वाव मिळावा, यासाठी माहिती-तंत्रज्ञान, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि औद्योगिक क्षेत्रातील तब्बल शंभर जण एकत्र आले. त्यांनी स्वखर्चातून मुलांचे कलागुण अधिक प्रगल्भ करण्यासाठी शिवांजली हेल्पिंग हॅण्ड्‌स हा अनोख्या उपक्रम सुरू केला. या माध्यमातून या मुलांना हक्‍काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 

निगडीतील ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात संस्थेतर्फे रविवारी (ता. ५) आयोजित तारांगण कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील अनाथाश्रमातील मुलांनी कला सादर केली. औंधमधील एका आयटी कंपनीमध्ये प्रोग्रॅमर म्हणून काम करणारे सागर मिसाळ यांना नऊ वर्षांपूर्वी अनाथ विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरवातीला सागरने १५ विद्यार्थ्यांच्या मदतीने उपक्रमाला सुरवात केली. कालांतराने अनाथ मुलांसाठी काम करणारे लोणावळ्यातील संपर्क बालआशाघर, केडुरमधील माहेर, चिखलीतील विकास आश्रम, बेळगावातील स्नेहालय स्पर्श आणि पवन मावळातील शाळकरी मुले या संस्था शिवांजली हेल्पिंग हॅण्डच्या माध्यमातून जोडले गेले. अनेकांना हा उपक्रम आवडला. या व्यासपीठाला मदत करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेक जण स्वयंसेवक म्हणून काम करीत असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. 

अनाथ विद्यार्थ्यांसाठी तारांगण, ग्रंथालयाची उभारणी, पुस्तकांचे वाटप, उन्हाळ्यात सहल, दीपावली काळात दिवे रंगवून त्याची विक्री असे उपक्रम राबवले जातात. दिवाळीत दिव्यांची विक्री करून जमा होणारी रक्‍कम ही याच विद्यार्थ्यांसाठी खर्च केली जात आहे. व्यासपीठ चालविण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील काही रक्‍कम त्यासाठी राखून ठेवत आहे. यासाठी सरकारकडून कोणतीही मदत घेतली जात नाही.

अनाथ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना समाजातून प्रेरणा मिळावी, ही बाब खरी आहे. कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न करता ही मुले मोठी असतात. त्यांना या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळाले आहे.
- बाबासाहेब काळे, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping Hand for the Orphans from Higher Education