आजारावर मात करत झाला पदवीधर

जितेंद्र मैड
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

आता सगळेच मार्ग खुंटले; यापुढे काही करता येणार नाही, असे म्हणत जी माणसे परिस्थितीला शरण जातात त्यांची प्रगती खुंटते; पण काही माणसे परिस्थितीला शरण न जाता पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते यशोशिखरावर नक्कीच पोचतात, याची प्रचिती हिमांशू पाटसकरला भेटल्यावर येते.

पौड रस्ता - आता सगळेच मार्ग खुंटले; यापुढे काही करता येणार नाही, असे म्हणत जी माणसे परिस्थितीला शरण जातात त्यांची प्रगती खुंटते; पण काही माणसे परिस्थितीला शरण न जाता पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते यशोशिखरावर नक्कीच पोचतात, याची प्रचिती हिमांशू पाटसकरला भेटल्यावर येते. 

सेरेब्रल पाल्सी असतानाही वाणिज्य शाखेचा पदवीधर झालेल्या हिमांशूला आता जर्मन भाषा शिकायची आहे. एमकॉम करून शेअर ट्रेडिंगसारख्या व्यवसायात करिअर करायची इच्छा आहे. क्रिकेटची आवड असलेला हिमांशू हा विराट कोहली आणि सलमान खानचा चाहता आहे. घरच्यांचा, मित्रांचा, शिक्षकांचा आणि समाजातील अनेकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळे मी येथवर पोचू शकलो, नाहीतर अपंग किंवा अडगळीतला जीव असे जीवन कंठणाऱ्यांमध्येच आपली गणना झाली असती, याची जाणीव हिमांशूला आहे. त्यामुळेच तो इतरांनासुद्धा सांगतो, प्रयत्न करत राहा... नक्की यश मिळेल... 

सेरेब्रल पाल्सी ही मेंदूची स्थिती आहे, रोग नव्हे. मुलाच्या अंगभूत क्षमता, पालकांचा नियमित उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळाल्यास या मुलांचा इतरांसारखाच विकास होऊन ती स्वावलंबी बनू शकतात.

आजाराचे निदान झाल्यावर आम्ही निराश झालो होतो. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर सेरेब्रल पाल्सीवर मात करता येते, याचा अनुभव आम्ही घेत आहोत. त्यामुळे तुमच्याकडे असे कोणी असेल तर निराश होऊ नका. त्याला पुढे जाण्यासाठी पाठिंबा द्या.
- जगदीश पाटसकर, वडील 

हिमांशूला शिकवणे म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान होते; पण हे आव्हान मी त्याच्याच मदतीने कसे पार केले. नियमित आणि मला सगळ्याच गोष्टी आल्याच पाहिजेत ही जिद्द त्याच्यात मला खूप प्रकर्षाने जाणवली आणि माझे काम अगदीच सोपे झाले. इतरांपेक्षा आपण कुठेही मागे पडणार नाही, याची तो पुरेपूर काळजी घेत असतो. 
- अर्चना मायदेव, शिक्षण तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Himanshu Pataskar Education Success Motivation