पिंपळवंडीची पंचाहत्तरीतील हिरकणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पिंपळवंडी - येथील ७५ वर्षांच्या हिराबाई दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी (ता. १९) एका दिवसात हरिश्‍चंद्र गड सर केला. दिवसभरात त्यांनी आपला नातू निखिल प्रमोद बारभाई याच्यासह कोकणकडा, मंदिर व राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच तारामती शिखर सर केले.

पिंपळवंडी - येथील ७५ वर्षांच्या हिराबाई दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी (ता. १९) एका दिवसात हरिश्‍चंद्र गड सर केला. दिवसभरात त्यांनी आपला नातू निखिल प्रमोद बारभाई याच्यासह कोकणकडा, मंदिर व राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच तारामती शिखर सर केले.

आपला नातू अनेक वेळा गड-किल्ले फिरायला जातो. आपणही हरिश्‍चंद्र गड सर केला पाहिजे, अशी इच्छा हिराबाई शिंदे यांना होती. त्यांनी नातू निखिल याच्याकडे ही इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार दोघे शनिवारी हरिश्‍चंद्र गड सर करण्यासाठी निघाले व एकाच दिवशी कोकणकडा, मंदिर व तारामती शिखर सर केले. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात घळईमार्गे गड उतरत असताना अंधार झाल्यामुळे त्यांना मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे निखिल यांनी पिंपळवंडी येथील आपल्या मित्रांना फोन लावले. त्यानंतर गडाच्या पायथ्याला असलेले चिंतामण कवठे हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांना घेऊन त्यांना शोधण्यासाठी गडावर गेले. त्यांच्या पाठोपाठ पिंपळवंडी येथील गिर्यारोहक पराग छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संदीप रोहकले, संदीप लेंडे, योगेश वामन, राजेश काकडे, राजेश साळुंखे, मयूर पवार, मंगेश गुजर, मयूर निमसे, संकेत शिंदे, सिद्धार्थ कसबे, प्रवीण काळे, योगेश सोमवंशी, सचिन क्षीरसागर, आयुब इनामदार हे तरुण गडावर रात्रीच्या वेळेस गेले. त्यानंतर सर्वांनी मिळून निखिल व हिराबाई यांना शोधले व सुखरूप पायथ्याला आणले.

आजीबाईने तारामती शिखर सर केल्याने तेथील रहिवासी अचंबित झालेले दिसले. कारण, हरिश्‍चंद्र गड सर करण्यासाठी खूप तरुण येत असतात, परंतु कोणी सहजासहजी तारामती शिखराकडे जात नाहीत. त्यामुळे सर्वांनी आजीबाईंचा सत्कार केला व त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hirabai Shinde Hirkani harishchandragad success motivation

टॅग्स