आजही माणुसकी जिवंत आहे... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. आकाशची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या आई वडिलांकडे मृतदेह नेणाऱ्या रग्णवाहिकेच्या भाड्यासाठी पैसे नसल्याने त्याचे मित्र, विद्यार्थी व शिक्षकांनी वर्गणी काढून भाडे जमा केले.

पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. आकाशची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या आई वडिलांकडे मृतदेह नेणाऱ्या रग्णवाहिकेच्या भाड्यासाठी पैसे नसल्याने त्याचे मित्र, विद्यार्थी व शिक्षकांनी वर्गणी काढून भाडे जमा केले. या घटनेतून समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला. 

आकाश जाधव हा विद्यार्थी गेवराई ( बीड) येथील ऊसतोडी करणाऱ्या व गवताच्या कोपीत राहणाऱ्या मजुराचा मुलगा आहे. तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याच्या मेसचा व शिक्षणाचा खर्च अहमदनगर येथील एक स्वयंसेवी संस्था त्याचे शिक्षक व मित्र करीत होते. तो घरात सर्वात मोठा होता, तर त्याला एक लहान भाऊ आहे. अपघात घडल्यानंतर त्याच्या घरचांना भ्रमणध्वनीवरून फक्त अपघात झाला असून तो सीरियस असल्याचे कळविले होते. त्याचे आई वडील व लहान भाऊ रात्री उशिरा मंचर येथे पोचले. आकाशचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्याचे आई, वडील कोसळले. मृतदेह गावी नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेला भाडे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेसुद्धा नव्हते. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. पंत, त्याचे शिक्षक मनोज भोजने, संदीप कुसळकर व विद्यार्थी मित्र यांनी वर्गणी काढून भाडे दिले. मग त्याचा मृतदेह गावी नेण्यात आला. आजही समाजात काहींमुळे माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. रविवार असतानाही अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या दोन तरुणांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मरणार्थ परिसराची साफसफाई केली. आकाश जाधव याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी थोडेफार कर्ज काढले होते ते फेडण्यासाठी व घरच्यांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: humanity is alive