स्वखर्चाने काढली ‘बळ्ळारी’तील जलपर्णी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

बेळगाव - शहरासह परिसरात सर्वत्र बुधवारी (ता. १५) स्वातंत्र्य दिनासह नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचवेळी वडगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी सण व इतर कामे मागे ठेऊन स्वखर्चाने जेसीबीद्वारे बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. अनेक वर्षांपासून नाल्यातील गाळ व जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचे याद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वडगाव, शहापूर, जुने बेळगाव आदी भागातील शिवारात पाणी घुसून शेकडो एकरातील भातपिके पाण्याखाली गेल्यामुळे खराब झाले आहे. काही ठिकाणी अजूनही पाणी साचून राहिले आहे. ज्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाली आहे, तेथे दुबार भात रोप लागवड करण्यात आली आहे. मात्र, पुन्हा संततधार सुरु झाल्यामुळे नाल्याला पुन्हा पाणी आले आहे.

चार दिवसापासून पुन्हा वडगाव, शहापूर शिवार पाण्याखाली गेले आहे. काही वर्षापूर्वी बळ्ळारी नाल्याची खोली जास्त होती. यामुळे पूर आल्यानंतर दोन किंवा तीन दिवसात पाणी ओसरत होते. मात्र प्रशासनाने नालासफाई व गाळ काढण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाल्याची खोली कमी झाली आहे. परिणामी, जोरदार पाऊस झाल्या पूर्ण शिवारात पाणी तुंबून राहत असून आठ ते पंधरा दिवस पाणी ओसरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके दरवर्षी खराब होत असून प्रशासनाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.

नाला परिसरातील अजूनही शेकडो एकर जमीन पाण्याखाली आहे. यामुळे शेतकरी पाणी ओसरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी नगरसेवक मनोहर हलगेकर, बाळू जुवेकर, हणमंत बाळेकुंद्री, आप्पाजी हलगेकर, सुनील पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

प्रशासन कधी लक्ष देणार?
बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांकडे लोकप्रतिनिधींनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. शिवारात अनेक दिवसांपासून नाल्यातील पाणी असून याकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hydrophytes removed from Ballari Canal