जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. पंचायत समितीने आता सर्व शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. एलईडी स्क्रीनवर मुले शिक्षण घेत असल्याचे चित्र लवकरच दिसेल. इस्लामपुरातून त्याची सुरवात झाली आहे. योजनेत लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे. 

इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. पंचायत समितीने आता सर्व शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. एलईडी स्क्रीनवर मुले शिक्षण घेत असल्याचे चित्र लवकरच दिसेल. इस्लामपुरातून त्याची सुरवात झाली आहे. योजनेत लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळा आणि खासगी शाळांतील वाढणारे अंतर, निकालावर होऊ लागलेला परिणाम, पालकांचा खासगी शाळांकडे वाढलेला कल या आणि अनेक कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांसमोर आव्हान निर्माण झाले. नवे प्रयोग व तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आकर्षित करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. वर्षभरात शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला. आता त्यापुढच्या प्रयोगाकडे म्हणजे शाळाच डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. काही दिवसांत जिल्हा परिषद शाळांतील मुले एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून शिक्षण घेताना दिसतील. 

अलीकडील काळात सामाजिक माध्यमांचे महत्त्व वाढत चालले आहे. एखादी गोष्ट वृत्तपत्र, दूरचित्रवाणीवरून समजण्यापूर्वीच मोबाईलवर समजू लागली आहे. त्याच पद्धतीने अभ्यासाचे स्वरूपदेखील बदलत चाललेय. मुले पुस्तके कमी आणि स्क्रीनवरचा मजकूर जास्त वाचू लागलीत. पाल्यांना मोबाईल आणि अशी माध्यमे उपलब्ध करून देणे हे अपरिहार्य बनत आहे. त्याचा विचार करून शाळांत असे स्क्रीन उपलब्ध करून मुलांना शिकवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. 

इस्लामपुरातील उर्दू शाळेत असा प्रयोग राबवला आहे. त्याचा चांगला अनुभव शिक्षक, विद्यार्थी घेत आहेत. वाळवा तालुक्‍यातील नेर्ले, बहाद्दूरवाडी येथे काम सुरू आहे. अन्य शाळांतही लवकरच प्रयत्न केले जाणार आहेत. 

""अत्याधुनिक तंत्रज्ञान, विकसित शिक्षण पद्धतीतून मुले घडवण्याचा ध्यास घेऊन हा उपक्रम राबवित आहोत. खर्चासाठी समाजाला आवाहन करीत आहोत. विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून नको त्या ठिकाणी पैसे खर्च न करता अशा उपक्रमांना मदत झाल्यास विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहील.'' 
मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, वाळवा पंचायत समिती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: islampur news zp school digital school