१७० जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

जळगाव - केशवस्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीतर्फे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत आज झालेल्या नेत्रदान संकल्प शिबिरात १७० जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून दिले.

जळगाव - केशवस्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीतर्फे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत आज झालेल्या नेत्रदान संकल्प शिबिरात १७० जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून दिले.

नेत्रदान चळवळ व्यापक व्हावी या हेतूने या पंधरवड्यात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन भवन येथे जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, महापालिका आदी कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता नेत्रदान संकल्प शिबिर घेण्यात आले. यात १७० शासकीय अधिकारी व कर्मचारी बांधवांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्पपत्र भरून राष्ट्रीय नेत्रदान चळवळीच्या यशस्वितेसाठी मोलाचा सहभाग नोंदविला. नेत्रपेढीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील कोठारी यांनी उपस्थितांना नेत्रदान, नेत्ररोपण याविषयी माहिती दिली. दीपस्तंभचे प्रा. राजेंद्र चव्हाण यांनी नेत्रदान विषयावर मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी नेत्रपेढीच्या राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमातील योगदानाबद्दल प्रशंसा केली व उपस्थितांना मरणोत्तर नेत्रदानाचे महत्त्व सांगून, स्वतः नेत्रदान संकल्प केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण यांनी डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रियांची माहिती दिली. केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीलकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, नेत्रपेढीचे संचालक सचिन चोरडिया, शिवाजीराव भोईटे, सिद्धार्थ बाफना, नेत्रपेढीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास वैद्य, डॉ. धीरज बडाले, डॉ. रेणुका चव्हाण उपस्थित होते. नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख शरद कोत्तावार यांनी प्रास्ताविक केले. कुणाल महाजन यांनी सूत्रसंचालन केले. संचालक तुषार तोतला यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news Eye donation