esakal | तिघा बंधूंच्या कष्टाची प्रेरक गाथा
sakal

बोलून बातमी शोधा

तिघा बंधूंच्या कष्टाची प्रेरक गाथा

तिघा बंधूंच्या कष्टाची प्रेरक गाथा

sakal_logo
By
सुभाष बिडे

घनसावंगी (जि. जालना) - दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्याऐवजी बोररांजणी (ता. घनसावंगी) येथील तीन बंधूंनी स्वतःच्या क्षेत्रात फुलांची शेती करून प्रत्येकाने आपापला संसार फुलविला आहे. 

गणेश सर्जेराव जाधव, किसन सर्जेराव जाधव, नारायण सर्जेराव जाधव हे तिघे बंधू दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत होते. साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी वडिलोपार्जीत प्रत्येकी चार एकर जमीन वाटणीने मिळाली होती. जमीन मिळाल्यानंतर लगेचच गणेश यांनी सुरवातीला गुलाबाच्या फुलांची शेती करायला सुरवात केली. त्यात त्यांना चांगला फायदा मिळाला. फुलशेतीत येण्यासाठी त्यांनी आपल्या दोन्ही बंधूंची मने वळविली. त्यानुसार झालेही. किसन, नारायण हे आपल्या वाट्यातील प्रत्येकी चार एकर क्षेत्रापैकी प्रत्येकी दोन एकरांत स्वतंत्रपणे शेवंती, निशिगंध, गुलाब, झेंडू व शेवंती, रंगबशिंगी अष्टर आदींसह अन्य फुलांची शेती करतात. जूनमध्ये शेवंती व वर्षभर मिळणारी फुले म्हणून गुलाब, गलांडा, निशिगंध आदी फुलांची लागवड केली जाते. त्यात शेवंतीची फुले दसरा ते दिवाळीपर्यंत हाती लागतात. त्यानंतर पांढऱ्या ‘बिजली’ फुलाची लागवड केली जाते. त्याचे दीड महिन्यापर्यंत उत्पादन हाती येते. याप्रमाणे दरवर्षी फुलांच्या लागवडीचा क्रम ठरतो. शेवंतीपासून अंदाजे दीड लाख, ‘बिजली’पासून तीस हजार, गुलाब, गलांडा यांच्यापासून पन्नास हजार असे एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. खते, कीटकनाशकांच्या फवारणीसाठी  पन्नास हजार रुपये खर्च येतो.

 फुलांची तोडणी केल्यानंतर घरी छाननी करून प्रतवारी ठरविली जाते. ओल्या कापडात गुंडाळून फुले बॉक्‍समध्ये भरली जातात. सकाळी मोटारसायकलद्वारे परतूर येथे किंवा रेल्वेने नांदेड, तर कधी औरगाबाद येथे नियमित फुलांची विक्री केली जाते. या ठिकाणी फुलांना चांगली मागणी असून, दरही चांगला मिळतो. स्थानिक पातळीवरही फुलांची विक्री केली जाते. फुलांच्या तोडणीसाठी घरातील महिला सहकार्य करतात. उन्हाळ्यात शेतीत फारसे काही काम नसते. त्यामुळे लग्नसंमारंभात फुलांच्या सजावटीतून एक लाखाची कमाई होते. फुलशेतीशिवाय हे तिघे उर्वरित प्रत्येकी दोन एकर क्षेत्रात कपाशी, सोयाबीन, मूग आदी पिके घेतात. त्यातही त्यांना चांगले उत्पादन मिळते.

या तिघांनी फुलशेतीचा प्रयोग केला त्या वेळी विहीर नव्हती. दुसऱ्यांकडून पाणी घेऊन ती फुलविली. एका वर्षी फुलशेतीतून मिळालेला सगळा नफा त्यांनी विहीर खोदकामासाठी वापरला. विहिरीलाही चांगले पाणी लागले. याच भागात येवला लघुसिंचन तलाव असल्याने त्यांच्या विहिरीची पाणीपातळी उन्हाळ्यातही कमी होत नाही. तिघांत एकच विहीर असल्याने ते आळीपाळीने शेतीला पाणी देतात. गेल्या दशकाहून अधिक काळ त्यांनी पारंपरिक शेतीला दिलेली फुलशेतीची जोड अजूनही घट्ट आहे!

प्रारंभी आम्ही तिघे बंधू दुसऱ्याच्या शेतात काम करीत होतो. वाटणीत जमीन मिळाल्यावर फुलशेतीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश मिळाले. दशकाहून अधिक काळ तिघे बंधू फुलशेती करीत आहोत. खते, औषध खरेदी, फुलांची विक्री एकत्रितच करीत असल्याने चांगला परिणाम हाती येतो. फुलशेतीतील कष्टाने बंधूंनी शेती खरेदी, घरांचे बांधकामही केले. आर्थिक अडचणीमुळे आम्ही शिकलो नसलो तरी आमची मुले उच्चशिक्षित होत आहे. शिवाय आता आमच्या शेतातच काम जास्त असल्यामुळे आता दुसऱ्यांच्या शेतात काम करण्याची गरज उरली नाही.
गणेश जाधव, शेतकरी

फुलशेतीतील बहुतांश कामे एकत्रित करीत असलो तरी आर्थिक व्यवहार स्वतंत्ररीत्या हाताळत आहोत. त्यामुळे बाजारात आमची तिघांची स्वतंत्रपणे पत निर्माण झाली आहे. फुलशेतीने आम्हाला तारले आहे. त्यामुळे दरवर्षी फुलशेतीच करायची खूणगाठ बांधली आहे. 
नारायण जाधव, शेतकरी

खरीप हंगामातील पारंपरिक पिकाच्या जोडीला फुलशेती करीत असल्यामुळे या परिसरात आमचे चांगले नाव झाले आहे. आमचे गाव परतूर रेल्वेस्टेशनपासून जवळच असल्याने फुलविक्रीची सोय झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न मिटला आहे.
किसन जाधव, शेतकरी

loading image