आईच्या मायेला जिल्हाधिकाऱ्यांची साथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे आज माझी भाची सोनाली हिची प्रकृती सुधारत आहे. आईच्या दातृत्वातून एक किडनी मिळाली आणि भाजीभाकरे यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे योग्य उपचार मिळाले आहे.
- अनिल खोत, सोनाली माळवे यांचे मामा 

कळस - दोन्ही किडन्या निकामी झालेल्या सोनालीला आईने एक किडनी देऊन तिचा पुनर्जन्म घडविला. मात्र, संसर्ग झाल्याने तिची प्रकृती खालावली. त्यामुळे कुटुंबीयांचा धीर सुटू लागला. मात्र, मूळच्या माढा (जि. सोलापूर) तालुक्‍यातील व सध्या सेलमच्या जिल्हाधिकारी असलेल्या रोहिणी भाजीभाकरे त्यांच्या मदतीला आल्या आणि सोनालीने मृत्यूला जिद्दीने परत पाठविले!

याबाबतची माहिती अशी, राजुरी (ता. फलटण) येथील सोनाली भरत माळवे (वय २७) यांच्या दोन्ही किडन्या काही दिवसांपूर्वी निकामी झाल्याने त्यांना तमिळनाडूतील कोवाई मेडिकल सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या आई आशा वसंत गावडे (रा. मराडेवाडी, ता. इंदापूर) यांनी त्यांना एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. रीतसर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सोनालीला किडनी रोपण करण्यात आली. मात्र, शरीरात संसर्ग झाल्याने प्रकृती पूर्णपणे खालावली. गावापासून शेकडो किलोमीटर लांब, अनोळखी शहरात कोण मदतीला येणार, या विवंचनेत तिच्या नातेवाइकांनी धीर सोडला. मात्र, पळसदेव (ता. इंदापूर) येथील सोनाली यांचे मामा अनिल खोत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तमिळनाडूत काही मदत मिळेल का, याची चाचपणी केली. त्यातून त्यांना माढा (जि. सोलापूर) तालुक्‍यातील रोहिणी भाजीभाकरे या तमिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांतून त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी भाजीभाकरे यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व रुग्ण महाराष्ट्रातील, आपल्या गावाकडील असल्याने त्यांनी तत्काळ कोईमतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. शिवाय संबंधित रुग्णालयातही थेट संपर्क साधून व्यवस्थापनाला संबंधित रुग्ण आपल्या जवळच्या व्यक्ती असून, त्यांच्यावर आवश्‍यक ते उपचार करण्याची सूचना केली. याचबरोबर कोईमतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधला. शिवाय जिल्हा आरोग्य अधिष्ठातांना या रुग्णाच्या प्रकृतीबाबत दैनंदिन अहवाल सादर करण्याची सूचना केली. 

दोन जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर रुग्णालयातील प्रशासनाने सोनाली यांची उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. सुमारे दोन महिने अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. शरीरातील संपूर्ण रक्त, रक्तपेशी बदलण्यात आल्या. या सगळ्या उपचारासाठी सुमारे तीस लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. रोहिणी भाजीभाकरे यांच्या मदतीमुळे व आई आशा गावडे यांच्या मायेमुळे सोनाली यांची प्रकृती स्थिर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalas news kidney donate humanity help