विजयदुर्ग होणार आंतरराष्ट्रीय बंदर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

दीड हजार कोटींची गुंतवणूक - गिर्येचाही समावेश

कणकवली - विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल. 
त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल; तर दहा हजार थेट रोजगार संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

दीड हजार कोटींची गुंतवणूक - गिर्येचाही समावेश

कणकवली - विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल. 
त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल; तर दहा हजार थेट रोजगार संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

येथील भाजप कार्यालयात श्री. जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयदुर्ग बंदराबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या दालनात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोर्ट ट्रस्ट, मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात विजयदुर्ग बंदर उभारणीवर शिक्‍कामोर्तब झाले. या तीन कंपन्यांच्या माध्यमातून लवकरच विजयदुर्ग बंदर विकासाचा आराखडा तयार केला जाणार आहे. पूर्णतः सरकारी असलेल्या या बंदराला केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘विजयदुर्ग बंदरासाठी ३५३ हेक्‍टर जागा लागणार आहे. त्यासाठी विजयदुर्गसह गिर्ये आणि रामेश्‍वर येथील जागा संपादनासाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. बंदरासाठी आवश्‍यक ती जागा ताब्यात येताच पुढील तीन वर्षांत बंदर उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या तीन ट्रस्टच्या माध्यमातून विजयदुर्ग बंदरासाठीची नवीन कंपनी तयार केली जाईल.’’

ते म्हणाले, ‘‘गोवा आणि मुंबई येथील बंदरांमध्ये वाहतूक वाढविण्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात देशात येणारा, तसेच देशातून जाणारा माल विजयदुर्ग बंदरातून आयात आणि निर्यात केला जाईल. याखेरीज, विजयदुर्गलगत होणाऱ्या रिफायनरी क्षेत्रासाठीच्या तेलसाठ्याची आयात विजयदुर्ग बंदर येथून होणार आहे. मोठमोठी जहाजे थेट बंदराला लागतील एवढी खोली विजयदुर्ग बंदराची आहे. सध्या असलेली १९ मीटर खोली वाढवून २५ मीटरपर्यंत केली जाईल.’’

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. हा प्रकल्प होत असताना जैतापूर गावाला दरवर्षी दोन कोटी रुपये द्यावेत, अशी अट करारात घालण्यात आली आहे. पण, तेथील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेने निधीची गरज नाही, असा ठराव केला आहे. तेथील शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे जैतापूर गावाचा विकास रखडला, असेही श्री. जठार म्हणाले.
 

दुसरी मुंबई वसणार
ब्रिटिशांनी मुंबई शहर वसवले. त्यानंतर तेथे उद्योग-व्यवसाय भरभराटीला आला. आता दुसरी मुंबई केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग-रत्नागिरी येथे वसणार आहे. ग्रीन रिफायनरी आणि विजयदुर्ग आंतरराष्ट्रीय बंदराच्या माध्यमातून २० ते २५ हजार रोजगार संधी निर्माण होतील. यामुळे मृत झालेली सिंधुदुर्गातील गावे पुन्हा जिवंत होणार आहेत, असे श्री. जठार म्हणाले.

राणेंचा प्रवेश मीच जाहीर करणार
नारायण राणे भाजपमध्ये येणार असल्याच्या अफवा वारंवार उठत आहेत. पण त्यावर कुणीही विश्‍वास ठेवू नये. राणेंना भाजपमध्ये यायचे असेल तर ते जिल्हाध्यक्ष या नात्याने मीच जाहीर करणार आहे. तसेच त्यांचा भाजप प्रवेश नसेल तर तेही मीच जाहीर करणार आहे. पक्षाने माझ्यावर पूर्ण विश्‍वास दाखविलेला आहे. तसेच यापुढचे जे राजकीय भूकंप होतील, ते सर्व भाजपलाच बळ देणारे असतील, असे श्री. जठार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kankavali konkan vijaydurg international port