कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कऱ्हाड - शहरातील पाच टन ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू होऊन त्याद्वारे विजेची निर्मिती करत, अखेर दिवे उजळविण्यात पालिकेला यश आले आहे. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या या प्रकल्पाला सध्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी अद्याप दोन महिने लागणार असले, तरी सध्या एक टनभर ओला कचरा मार्गी लागण्यास मदत होत आहे. 

कऱ्हाड - शहरातील पाच टन ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू होऊन त्याद्वारे विजेची निर्मिती करत, अखेर दिवे उजळविण्यात पालिकेला यश आले आहे. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या या प्रकल्पाला सध्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी अद्याप दोन महिने लागणार असले, तरी सध्या एक टनभर ओला कचरा मार्गी लागण्यास मदत होत आहे. 

पालिकेच्या निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाच्या कामास प्रारंभ झाला. काही काळ या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू होते. आरोग्य सभापतिपदाचा पदभार घेतल्यावर विजय वाटेगावकर यांनी त्याबाबत पाठपुरावा करून कामाला गती दिली. त्यातून या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आले. शहरात सध्या वाढीव भागासह शहरातून गोळा होणाऱ्या ४० टन कचऱ्यात ओल्या कचऱ्याचे प्रमाण २० टन आहे. त्यातील पाच टन ओला कचऱ्यावर या प्रकल्पात प्रक्रिया होऊन त्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. सुमारे ९५ लाख रुपये खर्चून होणारा प्रकल्प जिल्हास्तरीय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून झाला. मुंबई येथील भाभा अनुशक्ती संशोधन केंद्र या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम करत असून, अविप्लास्ट कंपनीकडून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. दररोज पाच टन ओला कचऱ्यापासून ४० केव्हीए वीजनिर्मिती होणार आहे. त्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठीची इमारत, तसेच कचऱ्यासाठीची विहिरीचे काम पूर्णत्वास आले. त्यासाठी लागणाऱ्या जनित्राचीही सोय करण्यात येणार आहे. 

२० मे पासून या प्रकल्पास सुरवात झाली. सुरवातीला सुमारे दोन लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येऊन १०० किलो, दोनशे, तीनशे किलो यानुसार टप्प्याने कचरा टाकून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. सध्या या प्रकल्पात टाकलेल्या कचऱ्याचे बायोमिशेन गॅस निर्मितीद्वारे विजेची उपलब्धता होत आहे. आरोग्य सभापती श्री. वाटेगावकर, अभियंता ए. आर. पवार यांच्या उपस्थितीत काल सायंकाळी प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली. त्या वेळी या प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून निर्मिती केलेल्या विजेपासून दिवे लावण्यात आले. त्यामुळे पालिकेला कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यास यश आल्याचे दिसून आले.

२५ केव्हीए वीजनिर्मितीची शक्‍यता
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेवर प्रकल्पालगतच्या सांडपाणी प्रकल्पातील काही यंत्रणा चालते का? यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शिवाय परिसरातील पथदिव्यांसाठी या विजेचा उपयोग केला जाणार आहे. सुरवातीला किमान २५ केव्हीए विजेची निर्मिती होण्याची शक्‍यता असून, ती उपयोगात आणण्याचे नियोजन सध्या सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karad news Electricity waste