किडनी दानातून भावाला रक्षाबंधनाची भेट

अमोल जाधव
रविवार, 26 ऑगस्ट 2018

रेठरे बुद्रूक - बहीण आपल्या भावाला रक्षेचे प्रतीक म्हणून राखी बांधते; परंतु शेरे (ता. कऱ्हाड) येथील संजयनगर वसाहतीत राहणाऱ्या गोसावी कुटुंबातील दोन्ही किडन्या निकाम्या झालेल्या भावाच्या सुरक्षेसाठी बहीण सरसावली आहे. ५ सप्टेंबरला किडनीच्या प्रत्यारोपणाद्वारे भावास जीवनदान देताना रक्षाबंधनाचा अनोखा धागा ती गुंफणार आहे. ही शस्त्रक्रिया कोल्हापुरात येत्या ५ सप्टेंबरला होणार आहे.

रेठरे बुद्रूक - बहीण आपल्या भावाला रक्षेचे प्रतीक म्हणून राखी बांधते; परंतु शेरे (ता. कऱ्हाड) येथील संजयनगर वसाहतीत राहणाऱ्या गोसावी कुटुंबातील दोन्ही किडन्या निकाम्या झालेल्या भावाच्या सुरक्षेसाठी बहीण सरसावली आहे. ५ सप्टेंबरला किडनीच्या प्रत्यारोपणाद्वारे भावास जीवनदान देताना रक्षाबंधनाचा अनोखा धागा ती गुंफणार आहे. ही शस्त्रक्रिया कोल्हापुरात येत्या ५ सप्टेंबरला होणार आहे.

शेरे येथे बेघर वस्तीत (संजयनगर) दाजीराम गोसावी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. या भूमिहीन कुटुंबाचा नदीवरील मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो. दाजीराम व त्यांच्या पत्नी सुमन वयाने थकल्याने कुटुंबाची जबाबदारी सचिनवर आहे. बीए, बीएडसह विद्युत तारतंत्रीचे प्रशिक्षण घेतलेला सचिन नोकरीने हुलकावणी दिल्याने मासेमारीचा व्यवसाय करतोय. त्यावर तो कुटुंबाचा गाडा हाकत आहे. 

दोन वर्षांपूर्वी शेरेजवळच्या कृष्णा नदीमध्ये मासेमारी करताना सचिनच्या मांडीला सर्पदंश झाला. विषाच्या तीव्र परिणामामुळे त्याच्या दोन्हीही किडन्या निकाम्या झाल्या. त्याच्यावर कऱ्हाड व कोल्हापूर येथे उपचार झाले. घरची परिस्थिती कठीण असल्याने उपचार घेणेही पेलत नव्हते. त्याच वेळेस त्याने २००५ व २००६ मध्ये नदीला आलेल्या महापूर स्थितीत आपल्या नावेतून ग्रामस्थांना बाहेर काढल्याची मदत त्याला कामी आली. ग्रामस्थांनी त्याच्या उपचारासाठी सुमारे एक लाखाची मदत जमा करून दिली. त्यातून सचिनवर उपचार झाले. मात्र, त्याच्या दोन्हीही किडन्या निकाम्या झाल्या.

किडनीचे प्रत्यारोपण करण्यासाठी आर्थिक ताकद कमी पडल्याने तो कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे उपचार घेत आहे. किडनी प्रत्यारोपण करण्याचा डॉ. नाईक यांनी सल्ला दिल्यानंतर त्याला किडनी देण्यासाठी थोरली बहीण सुवर्णा या पुढे आल्या. सुवर्णा यांचे पती व दोन्ही मुले अकाली गेल्यामुळे त्यांचा सांभाळ वडील व भाऊच करतात. दररोज सकाळी सचिनने मासेमारी करून आणलेल्या माशांची त्या शेणोली स्टेशन येथे विक्री करतात. दिवसभराच्या वेळेत अंगणवाडी मदतनीस म्हणून काम पाहतात. किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक चाचण्या झाल्या आहेत. ५ सप्टेंबरला सचिनवर शस्त्रक्रिया होणार आहे.

सचिनची धडपड अन्‌ मदतीची गरज
सचिन दररोज सायंकाळी नदीत मासे पकडण्यासाठी जाळे टाकून येतो. सकाळी जाऊन जाळे बाहेर काढून आणतो. डायलेसिसवर जगणाऱ्या सचिनची जगण्याची धडपड हृदय हेलावून टाकणारी आहे. सचिनच्या आईची काही महिन्यांपूर्वी हृदयशस्त्रक्रिया झाली आहे. शासनाच्या ‘एक व्यक्ती एक वेळ लाभ’ या निकषामुळे शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून सचिनला किडनी प्रत्यारोपणासाठी मदत मिळणार नसल्याने तो सेवाभावी ट्रस्ट व संस्थांची दारे ठोठावत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidney Donate Brother Rakshabandhan Gift by Sister Humanity Motivation