जन्मदात्या आईने पुनर्जन्मही दिला, त्याचा 12 वा आनंदोत्सव

मनोज गायकवाड
मंगळवार, 17 एप्रिल 2018

अकलूज - स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे जीवन असह्य वाटू लागले. तेव्हा धीराच्या माईने त्याच्या पाठीवर हात ठेवला. आपली एक किडनी देऊन तिने आपल्या मुलाला जणू नवा जन्म दिला. जन्म आणि जीवनदान देणाऱ्या त्या आईच्या कुशीत विसावत त्याने आज (ता. 16) आपल्या पुनर्जन्माचा बारावा वाढदिवस साजरा केला.

अकलूज - स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे जीवन असह्य वाटू लागले. तेव्हा धीराच्या माईने त्याच्या पाठीवर हात ठेवला. आपली एक किडनी देऊन तिने आपल्या मुलाला जणू नवा जन्म दिला. जन्म आणि जीवनदान देणाऱ्या त्या आईच्या कुशीत विसावत त्याने आज (ता. 16) आपल्या पुनर्जन्माचा बारावा वाढदिवस साजरा केला.

अजय काळेल असे या मुलाचे नाव असून त्याच्या आईचे नाव आहे वैजयंता रामा काळेल. अभ्यासात हुशार व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून अजय श्रीपूर परिसराला परिचित होता. प्रणव प्रतिष्ठानचे साहित्यिक उपक्रम आणि विजय-प्रताप युवा मंचाचे सामाजिक उपक्रम यामध्ये त्याचा उल्लेखनीय सहभाग असायचा. तो कोल्हापूर येथे बी. एस्सी. ऍग्रीचे शिक्षण घेत होता. ज्येष्ठांचा आदर करणारा अजय तरुणांमध्ये उद्योग, व्यवसायाची बिजे रुजविण्यासाठी सतत धडपडत होता. कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. 2005-06 मध्ये परीक्षेच्या अभ्यासाठी तो राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात गेला. आपल्या सुस्वभावाने तिथेही त्याने अनेक नवे मित्र जोडले. तेथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असताना त्याला शारीरिक त्रास जाणवू लागला. सुरवातीला श्रीपूर व नंतर अकलूज येथे उपचार घेतले. दरम्यान, त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे ऐकून वडील रामा व आई वैजयंता काळेल यांना मोठा धक्का बसला. या मुलाला या आजारातून बाहेर काढण्याचा निश्‍चय त्यांनी केला. संजय, राजू, विजय ही त्याची अन्य मुलेही पुढे सरसावली. उपचारासाठी अनेक ठिकाणी भटकंती सुरू झाली. अनेकांकडून मिळणारे वेगवेगळे सल्ले, रुग्णाची व कुटुंबीयांची ढासळलेली मानसिकता यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी, ऍलोपॅथीचे उपचार घेताना काही पारंपरिक रूढी परंपरांचाही त्यांनी आधार घेतला. मोठी धावाधाव करूनही रुग्णाला विशेष फरक पडत नव्हता. अखेर किडनी बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी, अख्ख्या कुटुंबाने अजयला किडनी देण्याची तयारी दाखवली. मात्र, त्याला आपलीच किडनी देण्यावर आई ठाम होती.

अखेर 16 एप्रिल 2006 रोजी पुणे येथे आई व अजयवर शस्त्रक्रिया करून किडनी रोपण करण्यात आले. आईच्या दोनपैकी एक किडनी अजयच्या शरीरात कायमची स्थिरावली. त्याला काहीसे व्यंगत्व आले होते. शरीराने काहीसा खचला होता. मानसिक आघातही झालेला होता. त्याही स्थितीत 2008 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. मुलाखतीत अपयश आले तरी त्याची धडपड सुरू होती. अखेर 2008 मध्ये कृषी अधिकारी या पदावर कोकण विभागातील राजापूर (जि. रत्नागिरी) येथे त्याची नियुक्ती झाली. गेली 10 वर्षे तो तेथे अतिशय चांगल्या रीतीने काम करतोय. जलयुक्त शिवार, फळबाग लागवड योजना यामध्ये त्याने अतिशय उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी उठाव करून त्याची झालेली बदली रद्द करायला प्रशासनाला भाग पाडले आहे.

किडनीरोपनाचा म्हणजेच पुनर्जन्माचा वाढदिवस साजरा करताना अजयने आई वैजयंता व आत्या भीमाबाई यांना सोन्याचे लक्ष्मीहार देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी त्याची पत्नी लता, भाऊ संजय, राजू, विजय, काका ज्ञानेश्‍वर, चुलत भाऊ अविराज, कविराज, रविराज यांच्यासह काळेल परिवारातील सदस्य उपस्थित होते. पुनर्जन्माचा हा आगळावेगळा वाढदिवस साजरा करताना या सर्वांच्याच मनात प्रेम आणि आपुलकीच्या भावना दाटून आल्या होत्या.

अनेकांचा मार्गदर्शक
अजयला किडनीचा विकार झाल्यावर खूप विदारक स्थितीतून जावे लागले. असे आजार झालेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबांना काहीअंशी दिलासा मिळाला पाहिजे, असे त्याला वाटू लागले. त्यातूनच त्याने अनेकांना मदत करायला सुरवात केली. किडनी रोपण कुठे केले जाते. त्यासाठी किती खर्च येतो. शासकीय मदत कशी मिळवायची. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे कशी जुळवायची. कोणकोणत्या संस्था अशा आजारांना आर्थिक मदत करतात. त्यांचे पत्ते, संपर्क क्रमांक व अन्य बाबींची माहिती संकलित करून त्याने अनेकांना मदत करून दिलासा दिला आहे.

वास्तविक आई एकदाच जन्म देते मात्र, माझ्या आईने मला दोनवेळा जन्म दिला आहे. तिच्यामुळेच आज मी या जगात आहे. 8 जून 1974 ला आईने मला जन्म दिला आणि 16 एप्रिल 2006 रोजी तिने किडनी देऊन पुनर्जन्म दिला. तिचे हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही.
- अजय काळेल

मुलांच्या सुखातच आई-वडिलांचे सुख असते. मला मुलाला ठणठणीत करायचे होते. त्यामुळे, कसलाही विचार न करता किडनी देण्याचा निर्णय घेतला होता. अवयवदानामुळे ते शक्‍य झाले. एकेका किडनीवर आम्ही दोघेही सुस्थितीत आहोत.
- वैजयंता काळेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kidney donate to son by mother motivation life