वास्तवाला भिडणारा चित्रकार 

(शब्दांकन - बलराज पवार)
शुक्रवार, 30 जून 2017

कलाकारांमध्ये एक वेगळीच दृष्टी असते. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीकडे आपल्यातील कलाकाराच्या नजेरेने पाहत असतात. विशेष करून चित्रकारांमध्ये हे वेगळेपण जाणवण्याइतके असते. शांतिनिकेतन कलाविश्‍व महाविद्यालयात अध्यापक म्हणून काम करणारे चित्रकार सत्यजित वरेकर यांच्याकडे असेच वेगळेपण आहे. नंदी, धनगर, हर्णे बंदरातील मासेमारीनंतरचा बाजार हे विषय त्यांनी चित्रकाराच्या नजरेतून वेगळेपणाने मांडले. विविध देशांत त्यांची चित्रे गेली आहेत. लाजरा स्वभाव असणारा हा चित्रकार कुंचल्यातून जास्त बोलतो... 

शांतिनिकेतनच्या कलाविश्‍व महाविद्यालयात मी शिक्षण घेतले. तर अभिनव कलाविद्यामंदिरमध्ये जी. डी. आर्ट पूर्ण केले. प्रसिद्ध चित्रकार डी. एस. माजगावकर हे माझे गुरू. शाळेत शिकत असताना पुस्तकापेक्षा चित्रात जास्त रमत होतो. "सकाळ'च्या वतीने घेण्यात येणाऱ्या बाल चित्रकला स्पर्धेत मी केंद्रात पहिला आलो आणि माझा आत्मविश्‍वास वाढला. त्यापेक्षा घरच्यांनाही माझ्या चित्रकलेबद्दल थोडा विश्‍वास वाटू लागला. शिकत असताना चित्रकलेच्या ग्रेड परीक्षाही मी उत्तीर्ण झालो. त्यामुळे चित्रकलेत करिअर करायचं असं ठरवलं. त्याला घरच्यांचा विरोध होता. चित्रं काढून पोट भरतं का? हा आजही प्रश्‍न आहे. पण घरच्यांनी परवानगी दिली. सामान्य घरातील मुले या क्षेत्रात येत नाहीत. पण चुलत्यांनी मला 10 वी नंतर मला शांतिनिकेतन कलाविश्‍व महाविद्यालयात घातले. मी चित्रकला विषयात डिप्लोमा केला. आज मी जेथे चित्रकला शिकलो तेथेच शिकवत असल्याचा अभिमान आहे. 

चित्रकलेचे विविध प्रकार असले तरी मला ऑईल पेंटमध्ये चित्रं काढणे आवडते. कारण ही चित्रे बरीच वर्षे तशीच राहतात. त्यांच्या रंगात बदल होत नाही. ही जगभरात पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. पाचशे वर्षांपूर्वी काढलेली चित्रे आजही तशीच दिसतात. पावडर शेडिंग किंवा पेन्सिलमधील चित्रे ही जास्त कालावधीपर्यंत रहात नाही. मला वैयक्‍तिक व सामाजिक विषयावर चित्रे काढायला आवडतं. सन 2008 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चित्र काढले होते. 

सामाजिक विषयात चित्रे काढताना मला एकदा नंदी बैल हा चित्रासाठी योग्य वाटला. त्या बैलाचा आब, त्याच्या मालकाचा रुबाब, त्यांची वेशभूषा हे आवडले आणि त्यावर चित्रांची मालिका केली. वेगवेगळ्या भावमुद्रामध्ये चित्रे रेखाटली. जहॉंगीर आर्ट गॅलरीत या चित्रमालिकेचे प्रदर्शन झाले. यातील एक चित्र शरद पवार यांच्या बारामतीमधील घराच्या हॉलमध्ये आहे. असेच एकदा कोकणात रत्नागिरीला गेलो असता हर्णे बंदरात सकाळी मासे विक्री करणाऱ्या महिलांची लगबग पाहिली आणि ती लगोलग कॅनव्हासवर उतरवली. त्याचीही मालिका केली. अशीच आणखी एक मालिका धनगर आणि त्यांच्या मेंढ्या या विषयावर केली. त्यांचे वेष, डोंगरावरील गवतात चरणाऱ्या मेंढ्या असा विषयही मला मालिकेसाठी आवडला. या मालिकांची प्रदर्शने जहॉंगीर आर्ट गॅलरीत केली. 

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुरजितसिंह बादल, रेडिफ मेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित बालकृष्णन अशा मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन चित्रे विकत घेतली. स्वित्झर्लंडचे गर्व्हनर यांनी चित्राची खरेदी केली आहे. परदेशात अमेरिका, कॅलिफोर्निया, इंग्लड आदी देशांत माझी चित्रे गेली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news artis Satyajit Vaarekar