शेतकरी झालो अन्‌ लेखकही 

शेतकरी झालो अन्‌ लेखकही 

मी शिवारात रमायचो... कॉलेजला असताना वहीची पानं भरभरून लिहायचो... मनात यायचं, भारी शेती करावी, आधुनिक शेतकरी व्हावं. पण, पैसा कमी अन्‌ म्हणून संधीही कमी. वहीची भरलेली पानं माझ्यापुरतीच राहतील, असं वाटून खिन्न व्हायचो. पण, संधी तुमचं दार कधी ठोठावेल खरच सांगता येत नाही. मी शाळेत हुशार होतो, नियोजनपूर्वक वाटचाल करत डॉक्‍टर झालो. मिरज तालुक्‍यातील खंडेराजुरी गावात छोटासा दवाखाना सुरू केला. शेतशिवारात राबणारी माणसं म्हणजे माझं पेशंट. त्यांच्यावर उपचार करता करता माझाही विकास होत गेला. हाती चार पैसे आले. त्या पैशातून भलामोठा दवाखाना बांधून "प्रसिद्ध डॉक्‍टर' व्हायचा मला मोह झाला नाही. जो काही पैसा हाती आला, तीच माझ्यासाठी संधी होती, शिवारात रमायची अन्‌ लेखक व्हायची. मी खंडेराजुरीत साडेचार एकर शेती घेतली, द्राक्ष व आंब्याची बाग लावली. माणसांचा डॉक्‍टर होतोच, आता वनस्पतींचा झालो. झाडवेलींची नस ओळखायला लागलो. बघता बघता शिवार असं काही फुललं की विक्रमी द्राक्ष उत्पादन हाती आलं. एकरी चाळीस टन. आंब्याची गोडी तर चाखत रहावी अशी. माझी यशकथा टीव्ही चॅनेल्सवर झळकली, "सकाळ ऍग्रोवन'ने दखल घेतली. 

सुदैवाने कॉलेजच्या काळात "सकाळ'सह काही वर्तमानपत्रांत माझे लेखन प्रसिद्ध झाले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. पुढे सोशल मीडिया आला, वॉटस्‌ऍप, फेसबुकने व्यक्त व्हायला वाटा दिल्या. मी अधिक लिहिता झालो. लोकांना ते आवडू लागलं. काहींनी सूचवलं, पुस्तक काढा. आता पैशांची काहीच अडचण नव्हती. लेखन कसदार आहे, असं वाचकच सांगत होते अन्‌ झालंही तसचं. माझा पहिला कथासंग्रह "गोष्टी छोट्या... डोंगराएवढ्या' आलं आणि त्याच्या तीन आवृत्त्याही संपल्या. दुसरं पुस्तक "माणसं' अलीकडेच बाजारात आलं असून त्याच्या दोन आवृत्त्या संपल्या आहेत. संधी, संधी काय असते हो ! तुमची स्वप्नं काय आहेत, हे स्पष्ट असलं की मार्ग सापडतोच. मग तो एका मोठ्या यशातून स्वप्नांकडे जाणारा असो किंवा एखाद्या अपयशानंतर अनुभवातून आलेलं शहाणपण असो. केवळ भौतिक गोष्टींत आनंद शोधायचा नसतो, एवढं कळलं तरी अनेक संधी समोर दिसतील आणि त्याचं सोनं करताना आव्हानांचे डोंगर लिलया पार होतील, हा माझा अनुभव आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com