फाऊंड्री उद्योगात रमले दीडशे कैदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहातील फाऊंड्री उद्योगात दीडशे कैदी रमले आहेत. सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजकडून कैद्यांना ही संधी दिली आहे.

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहातील फाऊंड्री उद्योगात दीडशे कैदी रमले आहेत. सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजकडून कैद्यांना ही संधी दिली आहे. याचे प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतनकडून दिले. आजपर्यंत ७५ कैद्यांनी फाऊंड्री उद्योगातील डिप्लोमा पूर्ण केला. केवळ शिक्षा नव्हे, तर प्रशिक्षण... हाताला काम आणि पगारही देण्याचे काम कळंबा मध्यवर्ती कारागृहात होत आहे.

केवळ कारागृह नव्हे, तर सुधारगृह बनविण्याची शासनाची धोरणे आता प्रत्यक्षात उतरत आहेत. शिक्षा झालेल्या कैद्यांच्या हाताला काम द्यायचे. त्यांना प्रशिक्षित करायचे. त्यांच्यावरील काळा डाग पुसून ते पुन्हा समाजजीवनात स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, असाच उपक्रम येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुरू आहे. कोल्हापूर उद्योगनगरी आहे. येथे फाऊंड्री मोठ्या प्रमाणात आहे. कारागिरांचीही कमतरता आहे. हीच कमतरता भरून काढण्यासाठी कैद्यांचा वापर झाला आहे. या कैद्यांना शासकीय तंत्रनिकेतनद्वारे प्रशिक्षित करण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत रोज भत्ता दिला.

कळंबा कारागृहात साधारण एक एकर जागेत फाऊंड्री उद्योग उभारला आहे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजकडून याला मोठा हातभार लागला आहे. आज दोन शिफ्टमध्ये उत्पादन मिळविले जात आहे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे दोन सुरपवाझर तेथे लक्ष ठेवून असतात. येथील कैदी मोठ्या आनंदाने हे काम करत आहेत. सरकारी नियमाने त्यांना रोज ६१ रुपये पगार मिळत आहे. येथे मोटारवाहनांसाठी आवश्‍यक उत्पादने तयार केली जात आहेत. येथील उत्पादने  देश-विदेशात पाठविली जात आहेत. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने कळंबा कारागृहाशी तीन वर्षांचा करार केला.
बाह्यकामाचा प्रस्ताव...

कळंबा कारागृहात बाह्य (ओपन) काम करणारे कैदी आहेत. त्यांना रोज सकाळी ८ वाजता एमआयडीसीतील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये बसमधून घेऊन जायचे आणि दुपारी चार वाजता परत आणायचे. इंडस्ट्रीजच्या बसमधून दोन कॉन्स्टेबलसह त्यांची ने-आण करायची, असा प्रस्ताव सध्या गृह खात्याकडे प्रलंबित आहे. तो मंजूर झाल्यास आणखी काही कैद्यांच्या हाताला काम मिळणार आहे.

शिक्षा झाली की, शक्‍यतो समाज अशा लोकांना पुन्हा मिसळू देत नाही. अशा वेळी त्यांना नोकरी मिळणे कठीण जाते. तेव्हा येथील प्रशिक्षण आणि कामाचा उपयोग होईल. शिक्षा संपल्यानंतर ते स्वतः उद्योग उभा करून स्वतःच्या पायावर उभे राहतील.
- शरद शेळके,
 कारागृह अधीक्षक

काही वर्षांपूर्वी सुटीत मॉरिशसला सहलीवर गेलो. तेथे हायवेचे काम सुरू होते. तेथील स्थानिक ठेकेदाराकडे विचारणा केली, हे सर्व चिनी कैदी आहेत. तेथे सातही दिवस काम सुरू असते. हीच कल्पना मी कोल्हापुरात वापरली. फाऊंड्री उद्योगातील कामगारांचा तुटवडा भरून काढण्यासाठी कैद्यांचा वापर केला. 
- किरण पाटील,
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय 
संचालक, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Kalaba Jail prisoner Special story