कंजारभाट तरुणांनी निर्माण केला एक वेगळा आदर्श

कंजारभाट तरुणांनी निर्माण केला एक वेगळा आदर्श

कोल्हापूर - गावकुसाबाहेर वंचितांचे जीवन जगणाऱ्या कंजारभाट समाजातील तरुणांनी एक आदर्श निर्माण केला. वर्षानुवर्षे त्यांच्या माथी मारलेला गुन्हेगारीचा शिक्का प्रयत्नपूर्वक पुसून हे तरुण थेट पोलिस दलातच दाखल झाले. यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे साधनतर मिळालेच; पण समाजाचे ऋण फेडण्याची एक संधीही प्राप्त झाली. गेल्या सात ते आठ वर्षांत मोरेवाडी, राजेंद्रनगर येथील कंजारभाट वस्तीमधून ११ तरुण पोलिस दलात भरती झाले. 

ना घराचा पत्ता, ना कुटुंबामध्ये शिक्षणाचे वातावरण. पारंपरिक दारू गाळण्याच्या व्यवसायामुळे गुन्हेगारीचा शिक्काही कायम माथी मारलेला. त्यामुळे चोर-पोलिसाचा हा खेळ आयुष्यभराचा. सतत वाद, भांडणे, पोलिस आणि लोकांकडून होणारी अवहेलना यातच कंजारभाट समाजातील मुले लहानाची मोठी होतात. बहुतांशी जणांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटते. कंजारभाट समाजातील अकरा तरुणांनी मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन आपले भविष्य बदलले.

तसेच समाजातील तरुणांपुढे एक आदर्शही निर्माण केला. बारावी झाल्यावरच त्यांनी पदवीचे शिक्षण घेत असताना पोलिस भरतीची शारीरिक आणि बौद्धिक तयारी सुरू केली. व्यायाम, धावण्याचा सरावाबरोबरच संवाद कौशल्यही त्यांनी आत्मसात केले. कोणी पहिल्या प्रयत्नात, तर कोणी दोन-तीन वेळा प्रयत्न करून पोलिस दलात भरती झाले. आता ते जिल्ह्याच्या विविध भागांत कार्यरत आहेत. पारंपरिक व्यवसायापेक्षा नोकरीत पैसे कमी मिळतात; पण समाधान अधिक मिळते. आपल्यामुळे कोणाचे नुकसानही होत नाही, याचा आनंद मोठा असल्याचे पोलिस नाईक अनिल बाटुंगे सांगतात. तरुणांचा हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही; मात्र त्यांच्यामुळे समाजाला दिशा मिळाली. 

भरती झालेले तरुण
संग्राम माटुंगे, विकी मचले, विश्‍वनाथ बागडे, अनिल बाटुंगे, विशाल बाटुंगे, जयदीप बागडे, चंद्रशेखर बाटुंगे, प्रदीप मचले, रमेश मचले, राजेश माटुंगे.

मी पोलिस दलात भरती झालो. त्यानंतर बाकीच्या तरुणांनाही भरतीसाठी मदत केली. कसा अभ्यास करायचा, आहार कसा ठेवायचा, हे सर्व सांगितले. बघता बघता अकरा जण पोलिस भरती झाले. कंजारभाट समाज बदलतोय. तेथील तरुण पारंपरिक व्यवसाय सोडून उदरनिर्वाहाचे नवे मार्ग शोधत आहेत. 
- मोहन प्रकाश माटुंगे,
पोलिस नाईक, कागल  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com