एक वीट ग्रंथालयासाठी उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

कोल्हापूर - काही पुरोगामी विचारांच्या युवकांनी एकत्र येऊन ‘एक घर एक पुस्तक’ ही संकल्पना राबवली. यातून एक लाख पुस्तके गोळा करण्याचा संकल्प केला. ३० हजारांहून अधिक पुस्तके जमाही झाली. पण, ही पुस्तके ठेवण्यासाठी आणि वाचनालय निर्मितीसाठी ‘एक वीट ग्रंथालयासाठी’ ही संकल्पना मांडली आहे. याद्वारे शहर आणि परिसरातील नागरिकांकडून घराचे बांधकाम संपल्यांनतरचे साहित्य जमा करून वाचनालये बांधण्यात येणार आहेत. 

सोशल मीडिया आणि टीव्हीच्या जमान्यात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी या युवकांकडून होणाऱ्या प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत होत आहे. ‘एक घर एक पुस्तक’, त्यानंतर ‘एक लग्न एक पुस्तक’ अशा उपक्रमातून पुस्तके जमा करण्याचा उपक्रम चालू ठेवला. ही पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे किंवा रॅक आणि ग्रंथालये उभारण्यासाठीही नव्या मार्गाने रक्कम गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. घरातील दैनिकांची, जुनी पुस्तके आणि वह्यांची रद्दी बाजारात विकण्याऐवजी पुस्तकांसाठी द्या, असे आवाहन करण्यात आले.

नागरिकांनी यालाही चांगला प्रतिसाद दिला. ही रद्दी विकून पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे तयार करण्यात येत आहेत. सध्या शहरात दोन-तीन ठिकाणी या उपक्रमातून शाळा आवारात किंवा खासगी जागेवर वाचनालय सुरू आहेत. अशा संयुक्त उपक्रमांच्या सहाय्याने जिल्ह्यातील दहा गावांमध्ये वाचनालये उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

यांनतरचा वेगळा उपक्रम म्हणून ग्रंथालय बांधण्यासाठी शिल्लक विटा आणि वाळू जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची लहान-मोठी बांधकामे संपल्यानंतर काही प्रमाणात विटा, सिमेंट किंवा वाळू शिल्लक राहत असते. ही शिल्लक वाळू आणि विटांच्या सहाय्याने ग्रंथालय उभारण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. ‘एक वीट वाचनालयासाठी’ ही संकल्पना घेऊन हे युवक आता लोकांसमोर जात आहेत. प्रत्येक गावात युवक विद्यार्थी याचा प्रचार करीत आहेत. 

असाही पुढाकार 
अनेक नागरिकांनी शेकडो विटा आणि सिमेंटची अर्धी पोती तसेच वाळूही या उपक्रमासाठी दिली आहे. अनेक ग्रामपंचायती आणि खासगी लोकांनी ग्रंथालय खोलीसाठी जागा देण्याचे अभिवचन दिले आहे.

हे आहेत शिलेदार
पुस्तकांप्रमाणे ग्रंथालयांच्या भिंतीही जनसहकार्यातून उभ्या होतील, असा विश्‍वास ही योजना राबवणारे प्रशांत आंबी, आरती रेडेकर, कृष्णा पानसे, धीरज कठारे, दिलदार मुजावर, सुप्रिया अंगडी आदींनी दाखविला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News one Brick for Library activity