शाहू विचारांचा प्रसार करणारा अवलिया 

लुमाकांत नलवडे
सोमवार, 26 जून 2017

कोल्हापूर -  नाव - मानसिंग विष्णू पाटील. वय ः 35, राहणार ः कोल्हापूर, बारावी रात्र शाळेत बोर्डात पहिला. रात्र शाळेत शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्याची धडपड नक्कीच अनेकांना ऊर्जा देणारी. तरुण वयात अनेक उत्साही कामे तो करीत होता. कधी चांगली तर कधी उत्साहाच्या भरात चुकीचीही झाली, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहूंचा विचार त्याच्या रक्तात भिनलेला होता. तोच पुढे त्याला तारणारा ठरला. 

कोल्हापूर -  नाव - मानसिंग विष्णू पाटील. वय ः 35, राहणार ः कोल्हापूर, बारावी रात्र शाळेत बोर्डात पहिला. रात्र शाळेत शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्याची धडपड नक्कीच अनेकांना ऊर्जा देणारी. तरुण वयात अनेक उत्साही कामे तो करीत होता. कधी चांगली तर कधी उत्साहाच्या भरात चुकीचीही झाली, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहूंचा विचार त्याच्या रक्तात भिनलेला होता. तोच पुढे त्याला तारणारा ठरला. 

साधारण 2006 ला त्याने "शाहूंच्या आठवणी' हे राजर्षी शाहूंच्या विचारांच्या प्रसाराचे पुस्तक वृषाली प्रकाशनामार्फत प्रकाशित केले. दिवंगत प्रा. डॉ. नानासाहेब साळुंखे लिखित हे पुस्तक अल्प किमतीत सर्वांसमोर पोचविण्याचा ध्यासच त्याने घेतला. विशेष म्हणजे राज्यातील 20 जिल्ह्यांत त्याने हे पुस्तक पोचविण्याचा प्रयत्न केला. शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांपर्यंत राजर्षी शाहूंचे विचार, त्यांचे कार्य कसे पोचेल यासाठी तो धडपडत राहिला. स्वतःच्या मोटारसायकलीवरून त्याने थेट मुंबईही गाठली होती. मुक्काम आमदार निवासमध्ये केला. तेथेही त्याला शाहूंच्या विचाराचा चमत्कारिक अनुभव आला. 

मुंबईत मोटारसायकलीवरून फिरून पुस्तक विक्री करणे अशक्‍य होत असल्यामुळे त्याने लोकलमधून फिरून पुस्तक विक्री सुरू केली. एक दिवस तो गडबडीत लोकलमध्ये चढला आणि त्याला टीसीने पकडले. खाली उतरविले तेंव्हा त्याच्या लक्षात आले, लोकलमध्ये रेग्युलर तिकीट असून फस्ट क्‍लासच्या डब्यात बसल्यामुळे टीसीने पकडले आहे. तेव्हा सुमारे तीनशे रुपयांपर्यंत दंड होणार असल्याचे टीसीने सांगितल्यावर मानसिंगचे पायच गळाले. त्याने राजर्षी शाहूंच्या पुस्तकाची माहिती टीसीला दिली. टी.सी.ने पुस्तक हातात घेताच चांगले काम करीत आहेस, असे सांगून विनादंड सोडून दिले. त्या उत्तर भारतीय टीसीलाही राजर्षी शाहू महाराजांचे कार्य माहीत होते. 

पुणे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, नांदेड, बीड, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, परभणी आणि कोकणातीही मानसिंगने मोटारसायकलीवरून फिरून राजर्षी शाहूंचे विचार पुस्तकरुपी पोचविण्याचा प्रयत्न केला. तेथील शाळा-कॉलेजातही शाहूंचे विचार त्यांचे कार्य पोचविल्याचा मानसिंगला आनंद आहे. राज्यातील वीस जिल्ह्यांत आजपर्यंत त्याने सुमारे सव्वालाख पुस्तकांची विक्री केली आहे. ही विक्री करीत असताना दिवंगत प्रा. डॉ. नानासाहेब साळुंखे यांनी कधीही पुस्तकातून मानधनाची अपेक्षाच ठेवली नाही. केवळ शाहूंचे कार्य म्हणून त्यांनी हे काम केले आहे. 

एक संकल्प करू या... 
शाहू जयंतीच्या निमित्ताने या वर्षीच्या राजर्षी शाहूंचे विचार जपू या. त्यांच्या नावाचा दैनंदिनीत कोठे सहज बोलताना अनादर होणार नाही याची काळजी घेऊ या. त्यांचे खरे कार्य आणि विचार पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आपण करू या, म्हणजे खऱ्या अर्थाने शाहू जयंती साजरी होईल, असे मानसिंग पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Shahu Maharaj