जखमी पतीच्‍या उपचारासाठी दोन वर्षे कचरा वेचून केला खर्च

जखमी पतीच्‍या उपचारासाठी दोन वर्षे कचरा वेचून केला खर्च

कोल्हापूर - सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी त्याची पत्नी सावित्रीने केलेला निर्धार पिढ्यान्‌पिढ्या आपण ऐकत आलोत. कथा खरी की खोटी हा वेगळा भाग आहे, पण माळवाडी शिरोली (ता. हातकणंगले) येेथील एक सावित्री तिचा जखमी पती बरा होऊन स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहावा म्हणून गेली दोन वर्षे कचरा वेचून कुटुंब आणि पतीच्या औषधोपचाराचा खर्च चालवत आहे. 

पतीला पूर्ण बरे करायचे, त्याला त्याच्या कामावर रुजवायचे आणि त्यानंतरच कचरा वेचायचे काम थांबवायचे, असा तिचा निर्धार आहे. घरातलाच काय तो कचरा माहीत असलेली ही सावित्री, गेली दोन वर्षे गावाच्या कचऱ्यात आपल्या कुटुंबाचं सुख शोधत आहे. 

शिरोलीतल्या वैशाली तानाजी गोसावी या आजच्या काळातील सावित्रीची ही कष्टाची कथा आहे. ती शिरोलीत माळवाडी भागात राहते. दोन मुले, पती व ती असे चौघांचे हे कुटुंब. पती गवंडी काम करायचे. त्यावर हे कुंटुब उदरनिर्वाह चालवायचे. दोन वर्षापूर्वी एका वाहनाने पतीस धडक दिली. ते जखमी झाले. दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. उपचार सुरू झाले. पायात रॉड घालावे लागले. जखम गुंतागुंतीची. त्याचे वेगवेगळे उपचार करत राहावे लागले. या उपचारात जे साठवलेले होते, ते सारे संपून गेले आणि महिन्याच्या मिळकतीचे मार्ग बंद झाले. आताही उपचार चालू आहेत. पण पायातील रॉड काढण्याचा खर्च एकरकमी करणे अशक्‍य आहे. एक-एक रुपया वैशालीच्या दृष्टीने बैलगाडीच्या चाकाएवढा आहे. 

यातून मार्ग काढण्यासाठी ती दोन वर्षे झाली, रोज कचरा वेचत आहे. कचऱ्यात प्लास्टिक बाटल्या, वस्तू, पिशव्या सापडतील ते भंगारात घालायच्या व त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर चालवत आहे. एरव्ही फक्‍त घरातलाच कचरा माहीत असलेल्या वैशालीला पहिल्यांदा गावातल्या कचऱ्यात हात घालताना खूप त्रास झाला. पण परिस्थितीच अशी होती की, पुढे तिच्या वाट्याला रोज कचऱ्याचाच सहवास आला. 

पण तिला माहिती आहे, हे काम केले तरच आपला नवरा पुन्हा त्याच्या पायावर उभा राहणार आहे. कामावर जाऊ शकणार आहे. त्यातूनच पुन्हा आपले घर उभे राहू शकणार आहे. त्यामुळे ती रोज सकाळी सात ते दिवस मावळेपर्यंत राबते आहे. आज वटसावित्रीची पौर्णिमा. त्यामुळे त्यातूनही सवड काढून माळवाडीतल्या वडाला फेऱ्या मारून आली आहे. नवरा बरा होईपर्यंत आपल्या कष्टाला पर्याय नाही हे तीला माहीत आहे, त्यामुळे ती राबतेच आहे आणि त्या कष्टातून तिच्यातली सावित्री जाणवत आहे. 

संकटे सर्वांना येतात, पण संकट आले म्हणून हातपाय गाळून बसलो तर पोटाला काय खाणार? त्यामुळे मी कचरा वेचायचे काम सुरू केले. सुरवातीला अवघड गेले, पण मी हे काम करतच माझ्या नवऱ्याला त्याच्या पायावर पुन्हा उभा करणार आहे. 
- वैशाली गोसावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com