esakal | सरपंचांनी भागविली गावाची तहान
sakal

बोलून बातमी शोधा

सरपंचांनी भागविली गावाची तहान

म्हाकवे - उन्हाच्या तडाख्यामुळे पिराचीवाडी (ता. कागल) गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरीने तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. यावर मात करण्यासाठी सरपंच सुभाष भोसले यांनी दूधगंगा नदीतून शेतीसाठी आणलेल्या पाणी योजनेलाच गावची पाणी योजना जोडून दिलासा दिला. आठ दिवसांतून एकदा मिळणारे पाणी सरपंच भोसले यांच्या दातृत्वामुळे मुबलक मिळत आहे.

सरपंचांनी भागविली गावाची तहान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

म्हाकवे - उन्हाच्या तडाख्यामुळे पिराचीवाडी (ता. कागल) गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरीने तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. यावर मात करण्यासाठी सरपंच सुभाष भोसले यांनी दूधगंगा नदीतून शेतीसाठी आणलेल्या पाणी योजनेलाच गावची पाणी योजना जोडून दिलासा दिला. आठ दिवसांतून एकदा मिळणारे पाणी सरपंच भोसले यांच्या दातृत्वामुळे मुबलक मिळत आहे.

तालुक्‍यात पश्‍चिमेकडील डोंगरमाथ्यावर वसलेले पिराचीवाडी दोन हजार लोकवस्तीचे गाव. पिण्यासह शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. परिणामी उपजीविकेसाठी परपेठेवर हमाली करण्याशिवाय पर्याय नव्हता. वर्षभरापूर्वी गहिनीनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून सरपंच सुभाष भोसले यांनी अडथळ्यांची शर्यत पार करून दूधगंगा नदीतून सुमारे सात कि.मी. अंतरावरून पाणी योजना आणली. यामुळे गावात हरितक्रांती साकारायला मदत झाली.

पिण्याच्या पाण्याची योजना सोनाळी येथील विहिरीतून केली आहे. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरीने तळ गाठल्यामुळे महिनाभरापासून पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागत होती. अखेर गावची तहान भागवण्यासाठी भोसले यांनी शेतीचे पाणी कमी करून योजनेचे पाणी थेट गावच्या योजनेला जोडले. यामुळे गाव पाणीदार झाले.

विहिरीने तळ गाठल्याने गावात आठ दिवसांतून एकदा पाणी येत होते. गावकऱ्यांची पाण्यासाठी ऐन उन्हात वणवण होऊ नये यासाठी पिकांसह आर्थिक नुकसानीचा विचार न करता योजनेचे पाणी गावकऱ्यांना दिले.
 - सुभाष भोसले, सरपंच

अनेक अडथळ्यांवर मात करीत पाणी योजना करून पिराचीवाडीसारख्या डोंगरमाथ्यावर हरितक्रांती फुलविली आहे. गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्‌भवताच भोसले यांनी स्वतःच्या योजनेचे पाणी गावच्या योजनेला जोडून ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यात होणारी वणवण थांबवली. सुभाष भोसले आमच्यासाठी जलदूतच ठरले आहेत.
- दत्तात्रय सुतार, हौसाबाई दाभोळे, ग्रामस्थ, पिराचीवाडी

loading image