कोसबी गटग्रामपंचायतीतील सहा गावे बनली स्मार्ट

आर. व्ही. मेश्राम
बुधवार, 11 एप्रिल 2018

गावाचा सर्वांगीण विकास हाच ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. लोकांच्या हिताची कामे केली असून, पुढेदेखील विकासकामे करण्यात येणार आहेत. लोकांना विश्‍वासात घेऊन सहाही गावांचा विकास करण्याचे ध्येय आहे. कोसबी येथे आरोग्य केंद्र मंजूर झाले. लवकरच काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे.  
- अलका रामटेके, सरपंच, गटग्रामपंचायत, कोसबी.

सडक अर्जुनी - विविध शासकीय योजना राबविणे, विकासात्मक कामे करणे यातून कोसबी गटग्रामपंचायतीतील सहा गावांचा विकास करण्यात आला आहे. या गावात सर्वच स्तरांतील विकासकामे झाल्याने ही गावे स्मार्ट झाली आहेत. तालुक्‍यातील कोसबी हे गाव कोहमाराजवळील वशीकरण नदीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. 

कोसबी गटग्रामपंचायतमध्ये कोसबी, कोलारगाव, बकी, मेंडकी, कोसमघाट, मनेरी या सहा गावांचा समावेश आहे. कोसबी- ३१२, कोलारगाव- ७१२, बकी- ८२७, मेंडकी- २७४, कोसमघाट- ३६० व मनेरी ५५६ अशी एकूण ३०४१ लोकसंख्या आहे. सहा गावे मिळून तीन वॉर्ड तर ९ सभासद आहेत.

गटग्रामपंचायतीत येत असलेल्या सहाही गावांत पिण्याच्या पाण्याकरिता नळयोजना कार्यान्वित आहे. संपूर्ण गावामध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहेत. तांडा वस्ती नाली बांधकाम, दलित वस्तीत नाली बांधकाम करण्यात आले. बकी येथे समाज मंदिरांचे बांधकाम झाले आहे. शाळा वर्गखोली बांधकाम, कोसमघाट येथे खडीकरण, रोजगार हमी योजनेअंतर्गत मेंडकी, कोसमघाट येथे तलाव व पांदणरस्ता आदी कामे करण्यात आली आहेत. कोसबी गटग्रामपंचयातीमध्ये स्वतंत्र संगणक व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना लागणारी सर्व प्रकारचे दाखले येथे देण्यात येतात. त्याकरिता संगणक चालकाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. 

गटग्रामपंचायतीत येत असलेल्या सहाही गावांमधील घरांच्या भिंतींवर स्वच्छतेविषयी व इतर घोषवाक्‍य लिहिण्यात आले आहे. कोलारगाव, कोसमघाट, मनेरी येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. बकी येथे आठवीपर्यंतचे शिक्षण आहे. नुकतेच येथे आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे.

सहाही गावांतील सर्व परिसर स्वच्छ ठेवला जातो. नाल्या, गटारे आदींची स्वच्छता महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाच्या घरीदेखील स्वच्छता ठेवली जाते. ग्रामपंचयातीला २०१६-२०१७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kosabi grampanchyat smart sarpanch smart village motivation development