परिस्थितीवर मात करून दिला दीडशे जणांना रोजगार

krishnapawar
krishnapawar

गंगापूर - प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कनकोरी (ता. गंगापूर) येथील कृष्णा रावसाहेब पवार या तरुणाने उद्योगभरारी घेतली आहे. त्यांच्या लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या दुर्धर आजारामुळे वडिलोपार्जित एक एकर जमीन विकावी लागली. त्यातच १९७५ मध्ये त्यांचे निधन झाले. आईने दु:ख गिळून मोलमजुरी करून संसाराचा गाडा रेटला. त्यांनी शेतात जायचे अन्‌ मोठ्या मुलीने कृष्णाला सांभाळायचे असा दिनक्रम सुरू झाला; पण नियतीला हेही मान्य नव्हते.

शेतात काम करीत असताना १९८२ मध्ये वीज कोसळून आईचा मृत्यू झाला. वडील गेल्यानंतर आईने सावरलेला संसारच उघड्यावर पडला. तेव्हा कृष्णा दुसरीत होता. आई-वडिलांचे छत्र हरपल्यावर पोरक्‍या झालेल्या बहीण, भावंडास घेऊन आजी (आईची आई) एकोणीस सागज येथे शिक्षणासाठी घेऊन आली. गाव सोडावे लागले. कृष्णा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंत, माळीघोगरगाव येथे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे औरंगाबादच्या शासकीय आयटीआयला प्रवेश घेतला. वृत्तपत्र विकून शिक्षण पूर्ण केले. पुढे एका खासगी कंपनीत नोकरीही मिळाली. १९९९ मध्ये कृष्णा यांचे लग्न झाले. २००३ मध्ये कंपनी बंद पडली अन्‌ पुन्हा काळोख झाला. छोटा-मोठा व्यवसाय करून गुजराण सुरू झाली. पुढे २००५ मध्ये त्यांनी स्वतःची ‘माऊली इंडस्ट्रीज’ ही कंपनी सुरू केली. सुरवातीला खूप कष्ट घेतले. तहानभूक विसरून काम केले. हळूहळू जम बसला. व्हेरॉक कंपनीची व्हेंडरशिप मिळविली. त्यांच्या कंपनीमध्ये दीडशे जणांना रोजगार मिळाला. कंपनीची व्यवस्थित घडी बसली. अशातच २००८ मध्ये त्यांनी स्वतःचा एक प्लॉट विकला. यातून पैसे मिळाले. मग पैसे जमले की प्लॉट घेणे व विकणे असा व्यवसाय सुरू केला. प्लॉटिंगबरोबरच बांधकाम क्षेत्रातही ते उतरले. आजघडीला शंभर रो-हाऊस बांधणारे बिल्डर म्हणून ते नावारूपास आले आहेत. 

आजीचे कष्ट, पत्नीची साथ
मावशी, चुलते व आजीने मिळून १९९५ मध्ये कृष्णा पवार यांच्या बहिणीचे लग्न करून दिले. दीड वर्षापूर्वी आजी (आईची आई) यांचे निधन झाले. आपल्या यशात आजीचा मोठा वाटा असून, पत्नीची भक्कम साथ लाभल्याचे ते सांगतात. मित्र चांगले मिळाले अन्‌ त्यांच्या आधाराने शिखर सर केले, अशी भावना व्यक्त करताना आयुष्यात खडतर परिश्रमाला पर्याय नाही, हे वास्तवही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com