एका एकरात फुलवल्या ३५ भाज्या!

नागेश पाटील
बुधवार, 5 एप्रिल 2017

कुंभार कुटुंबीय - ठिबक सिंचनाचा उपयोग

चिपळूण - खेर्डीतील कुंभार कुटुंबीयाने बोअरिंगच्या पाण्यावर ठिबक सिंचन व वाफे तयार करून एका एकरात ३५ प्रकारचा भाजीपाला पिकवला आहे. खेर्डी-देऊळवाडी येथे शेकडो एकर जमीन ओसाड असताना कुंभार कुटुंबीयांनी केलेली शेती परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.

कुंभार कुटुंबीय - ठिबक सिंचनाचा उपयोग

चिपळूण - खेर्डीतील कुंभार कुटुंबीयाने बोअरिंगच्या पाण्यावर ठिबक सिंचन व वाफे तयार करून एका एकरात ३५ प्रकारचा भाजीपाला पिकवला आहे. खेर्डी-देऊळवाडी येथे शेकडो एकर जमीन ओसाड असताना कुंभार कुटुंबीयांनी केलेली शेती परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.

खेर्डी-दत्तवाडी येथील पांडुरंग कुंभार व बीएस्सी ॲग्री झालेला मुलगा नीलेश कुंभार हे ध्येयवेडे शेतकरी, मूल व सुना उच्चशिक्षित असतानाही ते शेतीसाठी पुरेपूर वेळ देतात. शेतीची आवड असलेल्या नीलेशने बहुपीक पद्धतीचा परिसरात पहिल्यांदाच प्रयोग केला आहे. आधुनिक व व्यावसायिक शेती होण्यासाठी उमेश दत्ताराम साळवी यांनी कुंभार कुटुंबीयांनी विनामोबदला जमीन दिली. भात मळणीनंतर ट्रॅक्‍टरने एका एकराची मशागत केली. पॉवरटिलरचा उपयोग केला. संपूर्ण शेतात गादीवाफे तयार केले. त्यामध्ये कोबी, मिरची, टोमॅटो, फ्लॉवर, काकडी, पडवळ, दुधी भोपळा, भेंडी, गवार, कांदा, फरसबी, घेवडा, पावटा, भुईमूग, वाल, वांगी, मका, मटार, झेंडू आदी ३५ प्रकारच्या भाजीपाल्याची यशस्वी लागवड केली. पिकास आवश्‍यक तेवढेच पाणी मिळावे, पाण्याची बचत व्हावी यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. ठिबकद्वारे दररोज दोन तास पाणी दिले जाते.

ताजा भाजीपाला मिळण्यासाठी अनेक ग्राहक शेतातच येऊन भाजीपाला घेऊन जातात. काहीजण घरी येऊन भाजीपाला खरेदी करतात. निघणारा भाजीपाला त्वरित विक्री होत असल्याने शहराच्या ठिकाणी त्यांना विक्रीसाठी धाव घ्यावी लागत नाही. नीलेशला शेतीची प्रचंड आवड. खासगी नोकरी सांभाळून तो शेतीसाठी मेहनत घेतो. 

मोकाट गुरांचा त्रास होऊ नये म्हणून शेतीला तारेचे कुंपण घातले आहे. काही वेळा माकडांचा त्रास उपद्रव जाणवतो. दिवसभर कुंभार कुटुंबीय शेतात हजर असल्याने फारसे नुकसान होत नाही. पहिल्या प्रयोगात उत्पन्नाची मोठी आशा न बाळगता नेमके कोणती पिके कशा पद्धतीने येतात याचा प्रात्यक्षिकातून कुंभार कुटुंबीयांनी अंदाज घेतला आहे. उमेश साळवी यांनी विनामोबदला दिलेली जमीनही या प्रयोगास मोलाचा आधार देणारी ठरली आहे. 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते व पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी आज कुंभार यांच्या प्रयोगशील शेतीस भेट देत पाहणी केली. त्यांच्या व्यावसायिक शेतीचे कौतुकही केले. ग्रामपंचायत परिसरातील शेतकऱ्यांनी सामुदायिक शेतीस पुढाकार घेतल्यास ग्रामपंचायत त्यांना सहकार्य करेल, असे आश्‍वासन खताते यांनी दिले.

कोकणच्या लाल मातीत मोठी उत्पादकता आहे. शेतकऱ्यांच्या ओसाड जमिनी ओलिताखाली आल्यास शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारेल. याची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मुलगा नीलेश याने जिद्दीने बहुपीक पद्धतीचा यशस्वी प्रयोग केला. नीलेशच्या जिद्दीला उमेश साळवी व आमच्या कुटुंबाची साथ मिळते आहे.
- पांडुरंग कुंभार, खेर्डी दत्तवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumbhar family success in agriculture vegetbale