श्रमदानात गणेशवाडीकरांचा रात्रीचा दिवस

राजेंद्र शिंदे
शनिवार, 19 मे 2018

खटाव - गणेशवाडी (ता. खटाव) या जेमतेम ४०० लोकसंख्या असलेल्या गावाने एकजुटीच्या जोरावर पाण्यासाठी देत असलेल्या लढ्याने लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या गावात ग्रामस्थांच्या श्रमदानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. अगदी रात्रीचा दिवस करून श्रमदान सुरू आहे.

खटाव - गणेशवाडी (ता. खटाव) या जेमतेम ४०० लोकसंख्या असलेल्या गावाने एकजुटीच्या जोरावर पाण्यासाठी देत असलेल्या लढ्याने लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या गावात ग्रामस्थांच्या श्रमदानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. अगदी रात्रीचा दिवस करून श्रमदान सुरू आहे.

टंचाई काळात प्रशासनाकडे टॅंकरची मागणी केली तर हे गाव औंध ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येते. औंधला नुकतीच पाणी योजना मंजूर झाल्याचे कारण सांगून ग्रामस्थांना मोकळ्या हाताने माघारी लावले जाते. त्याचा विचार करून ग्रामसभेत जलसंधारणाचा ठराव घेण्यात आला. स्वतःच्या हिमतीवर गाव पाणीदार करण्याचा ग्रामसभेत निर्धार झाला. गावकऱ्यांनी श्रमदान सुरू केले. ग्रामस्थांच्या कष्टाची दखल घेत माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विविध संस्था, संघटना व व्यक्तींकडून आर्थिक मदती मिळाली. त्याच्या जोरावर यांत्रिक कामांना गती आली. 

औंधपासून तीन किलोमीटरवर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गणेशवाडीचे ग्रामस्थ पाणीटंचाई कायमची मिटवण्यासाठी श्रमदान करून जलसंधारणाची कामे 

करताहेत. त्यासाठी त्यांनी दिवसभराचे नियोजन केले आहे. पहाटे पाचला उठून चार किलोमीटरवरून सायकलला कॅन बांधून सर्वप्रथम पाणी आणायचे. सकाळीच घरगुती कामे आवरून लवकर उरकून शिवारात श्रमदानाला हजर व्हायचे. दहा वाजता परत घरी येऊन जवळच असलेल्या कळंबीत रोजाने कामाला जायचे. पुन्हा रात्री नऊ ते एक या वेळेत लाईटच्या उजेडात श्रमदान करायचे, असाच ग्रामस्थांचा दिनक्रम आहे. नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेली कुटुंबेही या कामात सामील झाली आहेत.

गावकऱ्यांचा सध्याचा दिनक्रम!
पहाटे घरगुती कामे
सकाळी दहापर्यंत श्रमदान
सकाळी ११ ते सहापर्यंत रोजगार
सायंकाळी सहा ते नऊपर्यंत घरगुती कामे
रात्री नऊ ते मध्यरात्री एकपर्यंत श्रमदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: labour donation in ganeshwadi