अपंगावर मात करत त्रिकुटांचे श्रमदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

त्याग, दातृत्व व तळमळीतून लोणीत जलसंधारण कामात सलग २५ दिवस सहभाग
खटाव - लोणी (ता. खटाव) गावातील तीन अपंग ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामात आजअखेर सलग २५ दिवस सहभागी होऊन असामान्य असे कर्तृत्व करून दाखवले आहे. या त्रिकुटांनी आजअखेर दररोज दहा मीटर अंतराच्या अनेक समतल चर, वृक्ष लागवडीसाठी तयार केलेले खड्डे व कंपार्टमेंट बंडिंग तयार केल्या आहेत. त्यांच्या कामाची दखल केवळ शासन दरबारीच नव्हे, तर केरळसारख्या राज्यातून अधिकारी घेत आहेत.

लोणी गावातील नामदेव दत्तू काळे (वय ६५) हे पायाने अपंग आहेत. २५ वर्षांपूर्वी शेतातील इंजिन सुरू करताना हॅंडल वेगाने पायावर आदळल्याने गुडघ्यापासून पाय काढावा लागला. खटाव तालुक्‍यात इंजिन फिटर म्हणून सर्वपरिचित असलेले काळे गेले २५ दिवस इतरांबरोबर श्रमदान करत आहेत.

पाण्याच्या ध्यासाने अक्षरशः वेडा झालेल्या या अवलियाने रोजच्या ५०० रुपयांच्या कमाईवर पाणी सोडले आहे. दररोज इंजिन दुरुस्तीसाठी त्यांना बोलावणे येत आहे; पण गावात श्रमदान सुरू असल्याने काळे विनम्रपणे नकार देत आहेत. खरंतर घरची परिस्थिती हलाकीची आहे. दररोज रोजाने कामाला कुठंतरी जाण्याशिवाय कुटुंबाला पर्याय नाही, अशा स्थितीतही त्यांचे श्रमदान कधीच चुकत नाही. त्यांचा इंजिन दुरुस्तीत हातखंडा आहे. शेतातील कामांमध्येही ते खूप चोखंदळ समजले जातात. एक पाय नसूनही ते आजही शेतीची कामे करतात.

काळे यांच्यासोबत श्रमदानात सहभागी घेणारी दुसरी अपंग व्यक्ती शरद शंकर भोसले (वय ४५) असून, वातामुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला आकडी येते. दोन्ही हात वाकडे झाले आहेत. घरची हलाकीची स्थिती असूनही ते दररोज श्रमदान करतात. याच गावातील तिसरी व्यक्ती नकुसाबाई शिंदे असून, एक हात लुळा पडलेला आहे. श्रमदान करत, करत त्यांनी त्यांच्या दातृत्वाचीही चुणूक दाखवली आहे. स्वतःची चार एकर जमीन त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी कुठलीही आर्थिक अपेक्षा न ठेवता दिली आहे.

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते तिघांचा सत्कार
सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी तिघांची शिवारात भेट घेऊन त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे, तसेच त्यांनी नकुसाबाई यांचा साडीचोळी देऊन सन्मान केला, तर नामदेव काळे यांचाही संपूर्ण पोशाख व श्रीफळ देऊन सत्कार केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: labour donation by handicaped